LIVE UPDATES

मांगेलीत डोंगर खचून माती रस्त्यावर

काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 17, 2026 17:58 PM
views 36  views

दोडामार्ग : गुरुवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मांगेली फणसवाडीकडे जाणाऱ्या घाट रस्त्यावर शुक्रवारी सकाळच्या सुमारास खोक्रल ते मांगेली या महत्त्वाच्या मार्गावर डोंगराचा मोठा भाग खचून त्यावरील माती व मोठमोठी झाडे थेट रस्त्यावर कोसळली. काही क्षणांतच संपूर्ण रस्ता माती व झाडांच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या घटनेमुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आणि ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने मातीचा ढिगारा  बाजूला करून दुपार पर्यंत रस्ता वाहतुकीस सुरळीत केला.

  गुरुवारपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात पाणी झिरपल्याने ही दरड कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरड कोसळताना मोठ्या प्रमाणात लाल माती, दगड आणि झाडे रस्त्यावर आली. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या वाहनाला पुढे जाणे अशक्य झाले. सुदैवाने दरड कोसळताना कोणतेही वाहन त्या ठिकाणावरून जात नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

एसटी बससह अनेक वाहने अडकली....

दरड कोसळल्यानंतर मांगेली येथे गेलेली एसटी बस परतीच्या प्रवासात दोडामार्गकडे येत असताना या ठिकाणी अडकून पडली. बसमधील प्रवाशांना बराच वेळ रस्ता मोकळा होण्याची प्रतीक्षा करावी लागली. याशिवाय दुचाकी, चारचाकी तसेच वाहनांचीही दोन्ही बाजूंना रांग लागली होती. वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने नागरिकांना पर्यायी मार्गही उपलब्ध नव्हता.

लोकप्रतिनिधींनी घेतली तातडीने दखल...

घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस आणि खोक्रलचे सरपंच देवेंद्र शेटकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी तत्काळ तहसीलदार राहुल गुरव तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपकार्यकारी अभियंता सीमा गोवेकर यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली आणि रस्ता लवकरात लवकर खुला करण्याची मागणी केली.