
सिंधुदुर्ग : फिरोज बाबा प्रकरणात आता सिंधुदुर्गातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ठाणे शहरातील कापूरबावडी पोलिसांनी आता पुढील चौकशीसाठी काही जणांना समजपत्र बजावले आहे. यामध्ये सिंधुदुर्गातील सावंतवाडीचे ठाकरे सेनेचे रुपेश राऊळ,कोलगावचे अपक्ष जि.प.सदस्य मायकल डिसोझा,अमित नाईक, बाळा पेडणेकर,संजय परब या पाच नावांचा समावेश आहे.या सर्वांना BNSS च्या कलम 179 अन्वये चौकशीसाठी हजर राहण्याचे समजपत्र ठाणे पोलिसांनी दिले आहे. याबाबतची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.
BNSS 179 म्हणजे तपासाच्या अनुषंगाने व्यक्तीला हजर राहण्याचा लेखी आदेश असतो. गिरीजा राऊत यांनी माजी खासदार विनायक राऊत, गितेश राऊत यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर केलेल्या तक्रारीत शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ तसेच अंधश्रद्धेच्या नावाखाली झालेल्या प्रकारांचा उल्लेख आहे. याच प्रकरणाच्या अनुषंगाने पुढील तपासासाठी आता या ५ जणांना बोलावण्यात आल्याची माहिती आहे.या प्रकरणावरून आधीच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब आणि ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता थेट समजपत्र बजावल्याने या वादाला आणखी नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.











