
सावंतवाडी : आंबोली, गेळे आणि चौकुळ परिसरातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी फार्मर आयडी'ची अट शिथिल करण्यात यावी यासाठी स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या मागणीचे पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर केले. तसेच कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत तातडीने बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, आंबोली, गेळे व चौकुळ ही गावे विधानसभा मतदारसंघातील असून येथील शेतकरी वर्षानुवर्षे कबुलायदार गावकर जमिनीवर (महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर) पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून विविध कार्यकारी सोसायट्यांनी या शेतकऱ्यांना ७/१२ च्या आधारे कर्जपुरवठा केलेला आहे. शासनाने नुकतेच कर्जमुक्तीचे धोरण जाहीर केले आहे. मात्र, त्यासाठी 'फार्मर आयडी'ची जाचक अट घालण्यात आल्यामुळे स्थानिक निकषांनुसार सुमारे ९० टक्के शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरत आहेत. सन २०२५ मध्ये झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे येथील शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ न मिळाल्यास शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होतील.
या जाचक अटीमुळे शेतकरी लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली, राज्याचे कृषी मंत्री आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत तातडीने एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख दिनेश गावडे, विनायक दळवी, अर्चित पोकळे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.










