
देवगड : आंबा बागायतदारांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, उत्पादन खर्च कमी करून दर्जेदार उत्पादन घेता यावे, तसेच आंबा निर्यातीच्या संधींची माहिती व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, देवगड आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, २ डिसेंबर २०२६ रोजी ‘क्षेत्रीय किसान गोष्टी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जामसंडे येथील कै. मोरेश्वर गोगटे सांस्कृतिक भवन येथे सकाळी १० वाजता ‘आंबा पीक संरक्षण’ या विषयावर हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात रत्नागिरी येथील प्रगतिशील आंबा बागायतदार राजेश श्रीविलास पटवर्धन हे प्रूनिंग (छाटणी) तंत्रज्ञानाचा वापर करून फवारणीचा खर्च कमी करत आंबा उत्पादनात वाढ कशी साधता येईल, याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. रामेश्वर येथील आंबा संशोधन उपकेंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. अजय मुंज हे आंबा पिकावरील कीड व रोगांचे व्यवस्थापन आणि योग्य फवारणी तंत्रज्ञान याविषयी माहिती देणार आहेत.
तसेच जीएमआर एअरपोर्ट अथॉरिटीचे सहाय्यक महाव्यवस्थापक विश्राम सबनीस हे आंबा निर्यातीच्या संधी, निर्यात प्रक्रिया आणि त्यासाठी आवश्यक बाबींबाबत मार्गदर्शन करणार आहेत. आंबा बागायतदारांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासह उत्पादन खर्चात बचत, दर्जेदार उत्पादन आणि निर्यातक्षम आंबा उत्पादनाला प्रोत्साहन देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तरी देवगड तालुक्यातील जास्तीत जास्त आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आरती पाटील यांनी केले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








