
दोडामार्ग : नगरपंचायतीच्या मागील सभेत उपस्थित झालेल्या २५ लाखांच्या मुद्द्यानंतर सोमवारी झालेल्या सभेत आरएमसी प्लांटच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले. नगरपंचायत क्षेत्रात बांधण्यात येणारा आरएमसी प्लांट वनपरिक्षेत्राच्या आरक्षित जागेत उभारण्यात येत असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक संतोष नानचे व रामचंद्र ठाकूर यांनी केला आहे. नगरपंचायतीने नाहरकत दिलेल्या जागे ऐवजी अन्य ठिकाणी करण्यात येणारे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगत यामागे कुणाचातरी वरदहस्त असल्याचा आरोप लगावला व याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. याला नगराध्यक्ष यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तशा सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या.
कसई - दोडामार्ग नगरपंचायतची मासिक सर्वसाधारण सभा सोमवारी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष देविदास गवस, मुख्याधिकारी संकेत गायकवाड, नगरसेवक संतोष नानचे, रामचंद्र ठाकूर, रामराव गावकर, नगरसेविका संध्या प्रसादी, संजना म्हावळणर यांसह नगरसेविका व अधिकारी उपस्थित होते.
या सभेत अजेंड्यावरील विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली. मात्र, सभेचे कामकाज चालू असताना नगरसेवक संतोष नानचे, नगरसेवक रामचंद्र ठाकूर, नगरसेवक चंदन गावकर, स्वीकृत नगरसेवक पांडुरंग बोर्डेकर आदींनी काही मुद्द्यांवर आक्षेप नोंदवला. त्याचबरोबर प्रशासनाच्या कामकाजावर देखील बोट ठेवले.
ते म्हणाले, प्रशासन काही बाबींमध्ये चुकीची व खोटी माहिती देत आहे. सभेच्या सुरुवातीलाच संतोष नानचे यांनी मागील सभेच्या इतिवृत्तावरून प्रशासनाला धारेवर धरले. मागील सभेचे प्रोसिडिंग पानाला न चिकटवता स्टेपल करून देण्यात आले. प्रशासनाची ही कार्यपद्धत चुकीची असून मागील सभेचे इतिवृत्त चिकटवणे अत्यावश्य आहे सांगितले असता मागील सभेचे इतिवृत्त कायम झाले नव्हते त्या कारणाने ते चिकटवण्यात आले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नगरसेवक रामचंद्र ठाकूर यांनी मोकाट गुरे व श्वानांचा प्रश्न सभेसमोर उपस्थित केला. गेली कित्येक वर्षे मोकाट गुरांचा त्रास शहरातील नागरिकांना व वाहतुकीस होत आहे. त्यावर उपाययोजना करण्यात नगरपंचायतला अद्यापही यश मिळाले नाही का ? असा प्रश्न उपस्थित केला असता यावर लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, तसेच कोंडवाड्याचे काम पूर्ण झालेले असून रखवालदारा अभावी कोंडवाडा चालू करण्यात आलेला नाही. आपल्या नगरसेवकांच्या कोणाच्या संपर्कात जर एखादा रखवालदार असेल तर त्याचे नाव सुचवावे. त्वरित त्याची नियुक्ती करून कोंडवाडा चालू करण्यात येईल. त्यामुळे भटक्या गुरांच्या होणाऱ्या त्रासापासून शहरवासीय व वाहतूकदार मुक्त होतील असे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी सांगितले.
गणपती विसर्जन तळीच्या घाट पायऱ्या जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आल्या असल्याचा आरोप नगरपंचायत प्रशासनावर लगावण्यात आला. यावेळी या आरोपांचे खंडन करत नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी नगरपंचायतचा अपप्रचार केला जात असल्याचे सांगितले. नगरपंचायतच्या कुठल्याही नगरसेवकाने किंवा प्रशासनातील एखाद्या व्यक्तीने असे काम करण्यास सांगितलेले नाही. नगरपंचायतची नाहक बदनामी सहन केली जाणार नाही. त्या संबंधित जेसीबी चालकाला बोलावून या मागची खरी वस्तुस्थिती काय आहे? ती प्रथमतः जाणून घ्यायला हवी आणि त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल.
मागील सभेच्या इतिवृत्तात स्वीकृत नगरसेवक समीर रेडकर यांच्या विरोधात निषेधाचा ठराव घेण्यात आला होता. त्या विषयाबाबत सभेतील उपस्थित अध्यक्ष व सदस्य यांनी चौकशी करून त्या ठरावाला संमती दिली होती का ? असा सवाल अध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केला असता.
उपनगराध्यक्ष देविदास गवस यांनी याबाबत सखोल चौकशी करूनच निषेधाचा ठराव घेण्यात आला आणि त्याला सर्वानुमते मंजुरी दिली असल्याचे सांगितले. आपल्या वार्डात रस्त्यावर अतिक्रमण केल्याचा आरोप नगरसेविका संजना म्हावळणकर यांनी केला. संबंधिताला नोटीस देऊन तीन महिने झाले मात्र प्रशासन अद्याप कारवाई करत नाही. जर ही कारवाई उद्यापर्यंत नाही झाली तर आपण सर्व पोलखोल करू असा गर्भित इशारा त्यांनी यावेळी दिला.
२५ लाखांचा मुद्दा पुन्हा चर्चेत
मागील सभेत नगरपंचायत क्षेत्रात एमसॅंड प्रकल्प चालू करण्याच्या दृष्टीने २५ लाखांचा आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. आजच्या या सभेत पुन्हा त्या विषयाला वाचा फोडण्यात आली. यावर चव्हाण यांनी याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. चौकशी अंतिम दोषीवर कारवाई होणेही तितकेच गरजेचे आहे. अशा विषयावरून नगरपंचायतची नाहक बदनामी होत आहे. त्यामुळे या विषयाचा निष्पक्षपणे छडा लावणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.
शहरातील बांधकामे तूर्तास बंद करा
शासनाने दुष्काळ सदृश्य परिस्थितीत पाण्याचे व्यवस्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे अशा गोष्टी टाळण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत. त्यामुळे नगरपंचायत अखत्यारीतील जी बांधकामे आहेत ती तात्काळ स्थगित करण्यात यावीत. बांधकामासाठी मुबलक प्रमाणात पाणी लागते. त्यामुळे शहरात भविष्यात पाण्याचा तुटवडा भासू शकतो.
बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यामुळे भूगर्भातील पाणीसाठा कमी होऊन पाण्याच्या दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ नागरिकांवर येऊ शकेल. म्हणून शहरातील जी बांधकामे आहेत त्या बांधकामांना पूर्णतः स्थगिती देण्यात यावी अशी मागणी यावेळी नगरसेवक रामचंद्र ठाकूर यांनी केली आहे. तसेच पाण्याच्या संकटामुळे नगरपंचायत क्षेत्रात राज्यमार्गाच्या कॉंक्रिटीकरणाचे कामास सुरुवात होऊ नये, याकडे नगरपंचायतीने लक्ष द्यावे अशी मागणी केली.
विरोधक असल्यामुळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
केळीचे टेंब येथील विहिरीतील गाळ काढण्यासंदर्भात आपण वारंवार मागणी केली. याबाबत दोन वेळा ठरवाही घेण्यात आला. मात्र आपण विरोधी पक्षाचे नगरसेवक असल्यामुळे आपण जाणून-बुजून याकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक रामराव गावकर यांनी केला. यावर नगराध्यक्ष चव्हाण यांनी विहिरीचे गाळ काढण्याचे काम आता केले जाईल असे स्पष्ट केले.
मुख्याधिकारी सभागृहाला खोटी माहिती देतात
आपण मुख्याधिकारी यांच्याकडे एका विषयासंदर्भात दिलेला अर्ज नगराध्यक्ष म्हणून तुमच्याकडे त्यांनी पोहोच केला का? असा सवाल नगरसेवक रामचंद्र ठाकूर यांनी नगराध्यक्ष चव्हाण यांना विचारला. यावर नगराध्यक्ष यांनी नकार देत तुम्ही मुख्याधिकारी यांच्या नावाने अर्ज दिला असल्याने बहुदा त्यांनी तो दिला नसल्याचे सांगितले. त्यामुळे ठाकूर चांगलेच आक्रमक झाले व त्यांनी याबाबत मुख्याधिकारी गायकवाड यांना तुम्ही नगराध्यक्षांना अर्जाबाबत कल्पना का दिली नाही? तो अर्ज फक्त तुमच्या होता का? असे सवाल ठाकूर यांनी उपस्थित केले.
मुख्याधिकारी गायकवाड यांनी आपल्या नावे अर्ज असल्याने नगराध्यक्षांना आपण कल्पना दिली नसल्याचे सांगितल्याने ठाकूर यांनी तो अर्ज सादर करण्याची मागणी केली. यावेळी तो अर्ज नगराध्यक्ष यांच्याही नावे असल्याने मुख्याधिकारी गायकवाड हे सभागृहात खोटी माहिती देतात असे सांगितले.
अन्यथा गुन्हा दाखल करा
नगरपंचायतमध्ये प्रशासन अनधिकृत बांधकामांचे पैसे घेत असल्याने शहरात अनधिकृत बांधकामे वाढली आहेत, असा गंभीर आरोप रामचंद्र ठाकूर यांनी केला. तसेच नगरपंचायतच्या कामात आठ टक्के कमिशन घेत असल्याबद्दल गंभीर आरोप रामचंद्र ठाकूर यांनी केला. यावेळी नगराध्यक्ष चव्हाण यांनी नगरपंचायतची नाहक बदनामी करू नका, असे स्पष्ट केले. यावर नगरसेवक ठाकूर यांनी जर माझे आरोप चुकीचे असतील तर गुन्हे दाखल करा, जे सत्य आहे ते बाहेर येईल असे खडेबोल सुनावले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








