
दोडामार्ग : वेदांता कंपनीच्या बोअरवेलमुळे भूजल पातळी घटली असून, परिसरातील नदीही आटत असल्याचा आरोप वझरे परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीविरोधात शुक्रवारी तहसीलदार यांच्यासोबत बैठक घेऊ असे शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी ग्रामस्थांना सांगितले. तसेच चर्चा करून हा प्रश्न सुटणार नाही. कंपनीच्या अटींची पूर्तता झाली आहे का? याची विचारणा करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांना बोलावून घेऊ. या गावाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे असे आश्वासन संजू परब यांनी ग्रामस्थांना दिले.
कंपनीच्या कोणत्याही आमिषांना बळी न पडता आम्हाला येथे कंपनी नको ही ठाम भूमिका मांडा, असे आवाहनही त्यांनी ग्रामस्थांना केले. वझरे येथील ग्राममंदिरात आयोजित बैठकीत श्री. परब बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती तथा शिंदे शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, पंचायत समिती सदस्य स्नेहा गवस, बाळा नाईक, सज्जन धाऊस्कर, पिकुळे सरपंच आपा गवस, झरेबांबर सरपंच अनिल शेटकर, बाबी गवस, आंबडगाव सरपंच स्नेहा गवस, विठोबा पालयेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
बोअरवेलमुळे पाणी घटल्याचा ग्रामस्थांचा आरोप
बैठकीत ग्रामस्थांनी वेदांता कंपनीविरोधात आपली कैफियत मांडली. कंपनीच्या बोअरवेलमुळे परिसरातील पाण्याची पातळी कमी झाली असून, येथील जिवंत नदीही आटत चालल्याचे त्यांनी सांगितले. या नदीवर पंचक्रोशीतील अनेक गावांची पाण्याची गरज अवलंबून असल्याने तिच्या प्रवाहावर होणारा परिणाम चिंताजनक असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.
कंपनीला दिलेल्या ना-हरकत प्रमाणपत्राची (एनओसी) मुदत संपली असून, यापुढे एनओसी देणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी मांडली. त्यावर संजू परब यांनी ग्रामस्थांनी एनओसी देऊ नये आणि त्यासाठी विशेष ग्रामसभा घेऊन ठराव करावा, असे आवाहन केले. कंपनीच्या अटींची पूर्तता झाली आहे की नाही? याचीही प्रशासनाकडे विचारणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामस्थांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करणार
गणेशप्रसाद गवस म्हणाले, गावाच्या विकासासाठी ग्रामस्थ एकत्र आले आहेत. कंपनीमुळे गावाला फायदा होत नसेल, तर त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे. ग्रामस्थांनी संजू परब यांच्याकडे या प्रश्नात हस्तक्षेप करून पाठिंबा देण्याची मागणी केली होती. त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी विशेष लक्ष दिले जाईल. तसेच, कंपनीत स्थानिक युवकांना रोजगार मिळावा, यासाठी प्रयत्न केले जातील. ग्रामस्थांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासनही गवस यांनी दिले.
प्रदूषणच मिळणार असेल तर कंपनीचा उपयोग काय?
बाळा नाईक यांनी कंपनीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. कंपनीचे प्रतिनिधी ग्रामस्थांच्या प्रश्नांना थातुरमातुर उत्तरे देऊन विषय टाळतात. स्थानिकांना कोणताही फायदा न होता गावाला केवळ प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत असेल, तर अशा कंपनीचा उपयोग काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ग्रामस्थांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर कंपनी चालू देणार नाही, असा इशाराही नाईक यांनी दिला. ग्रामस्थांच्या मागण्या कंपनीसमोर मांडून त्यावर निर्णय घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.








