LIVE UPDATES

Rare Mouse Deer Rescued : विहिरीत पडलेल्या दुर्मिळ पिसोरी हरणाची सुटका

वन विभागाची यशस्वी कामगिरी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 11, 2026 04:06 PM
views 136  views
Forest Department rescue team safely rescues a rare Pisori Mouse Deer from a well in Sutarwadi, Chiplun.

चिपळूण : मार्गताम्हाणे खुर्द पैकी सुतारवाडी येथील एका आंबा-काजू बागेतील विहिरीत पडलेल्या दुर्मिळ पिसोरी हरणाची वन विभागाच्या बचाव पथकाने यशस्वीरीत्या सुटका केली. सुतारवाडी येथील प्रताप सुर्वे यांच्या मालकीच्या बागेतील विहिरीत एक वन्यप्राणी पडल्याची माहिती त्यांनी चिपळूणचे वनपाल एस. एस. सावंत यांना दिली. माहिती मिळताच सावंत यांच्यासह रामपूरचे वनरक्षक राहुल गुंठे, कोळकेवाडीचे वनरक्षक कृष्णा इरमले आणि आरआरटी टीमचे सदस्य अथर्व घाग यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पथकाने विहिरीत पाहणी केली असता, हा प्राणी ससा नसून दुर्मिळ पिसोरी हरीण असल्याचे निदर्शनास आले. सुटकेचे प्रयत्न सुरू असताना हरणाने विहिरीतील पाण्यात उडी मारून पोहण्यास सुरुवात केली. मात्र, बचाव पथकाने अथक प्रयत्न करत जाळीच्या साहाय्याने त्यास सुरक्षितपणे पकडले आणि पिंजऱ्यात ठेवून त्याची वैद्यकीय व शारीरिक स्थिती तपासली.

हरीण सुस्थितीत असल्याची खात्री पटल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यास त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले. रत्नागिरी (चिपळूण) विभागाच्या विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि चिपळूणचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली हे बचावकार्य पार पडले.