LIVE UPDATES

रमाकांत तामाणेकरांची शिंदे शिवसेनेसोबत जवळीक वाढली?

सिंधुदुर्गात चर्चाना उधाण : ठाकरे सेनेला रामराम ठोकून शिंदे सेनेत प्रवेश करणार?
Edited by: भरत केसरकर
Published on: November 11, 2026 04:47 PM
views 186  views
Ramakant Tamanekar with Shinde Shiv Sena leaders amid political discussions in Sindhudurg.

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात सध्या एका वाढदिवसाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. निमित्त आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि माणगाव खोऱ्यातील एकेकाळचे प्रभावी नेतृत्व असलेले रमाकांत तामाणेकर यांच्या वाढदिवसाचे. माजी जिल्हा परिषद सदस्य असलेले रमाकांत तामाणेकर यांचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर माणगाव खोऱ्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार राजकीय चर्चांना उधाण आलय. वाढदिवस साजरा करतानाचा सोहळा आता नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

दरम्यान, वाढदिवस साजरा करताना शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख दत्ता कोरगावकर, शिवसेना विभागप्रमुख आणि माजी सरपंच सचिन धुरी, अविनाश राणे, हरी कुडतरकर, शिवाजी आरेकर यांच्यासह शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची या वाढदिवसाला उपस्थिती होती. विशेष म्हणजे, रमाकांत तामाणेकर हे आजपर्यंत ठाकरे शिवसेनेचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. मग अचानक शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी वाढलेली जवळीक नेमकी कशाचे संकेत देतेय? रमाकांत तामाणेकर यांच्या राजकीय वाटचालीत नवं वळण येणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणगाव खोऱ्यात शिंदे शिवसेना आपली ताकद वाढवण्यासाठी तामाणेकर यांना गळाला लावण्याच्या प्रयत्नात आहे का? या चर्चांना आता उधाण आलं आहे. 

वाढदिवसाच्या निमित्ताने राजकीय समीकरणांची चर्चा

रमाकांत तामाणेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. एकीकडे ठाकरे शिवसेनेशी पूर्वीपासूनची निष्ठा आणि दुसरीकडे शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी वाढत चाललेला संपर्क या दोन राजकीय घडामोडींची सांगड आता घातली जात आहे. विशेष म्हणजे, माणगाव खोऱ्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढवायची असेल तर स्थानिक पातळीवर प्रभाव असलेलं नेतृत्व सोबत असणं शिंदे शिवसेनेसाठी महत्त्वाचं ठरू शकतं आणि याच समीकरणातून रमाकांत तामाणेकर यांच्याभोवती शिंदे शिवसेनेचं राजकीय वर्तुळ सक्रिय झालं आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

दत्ता सामंतांची जवळीक अन् निलेश राणेंच्या माध्यमातून प्रयत्न?

या संपूर्ण राजकीय चर्चेला आणखी एक महत्त्वाची पार्श्वभूमी आहे ती म्हणजे माणगाव येथील सेंट जोसेफ प्राथमिक शाळेच्या मंडपाची. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेसाठी मंडप उभारण्याकरिता रमाकांत तामाणेकर यांनी दत्ता सामंत यांच्याकडे पाच लाख रुपयांच्या देणगीची मागणी केली होती. त्यानंतर आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून अवघ्या पाच ते आठ दिवसांत पाच लाख रुपये खर्चाचा मंडप उभारून दिल्याचं सांगितलं जात आहे. या मंडपाच्या शुभारंभप्रसंगी शिंदे शिवसेनेचे आमदार निलेश राणे, दत्ता सामंत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित होते.

याचदरम्यान गणेशोत्सवात जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी थेट रमाकांत तामाणेकर यांच्या घरी जाऊन गणपती दर्शन घेतल्याचीही चर्चा आहे. या भेटीगाठी, सामाजिक उपक्रमांमधील सहभाग आणि आता वाढदिवसाच्या कार्यक्रमातील शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या सगळ्या घटनांकडे केवळ योगायोग म्हणून पाहायचं की यामागे काही मोठं राजकीय गणित आहे? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मात्र, रमाकांत तामाणेकर यांच्या शिंदे शिवसेनेतील संभाव्य प्रवेशाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

कोण आहेत रमाकांत तामाणेकर?  

रमाकांत तामाणेकर हे माणगाव खोऱ्यातील शिवसेनेचे एकेकाळचे प्रभावी आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. 2007 ते 2012 या कालावधीत त्यांनी माणगाव पंचायत समिती सदस्य म्हणून काम पाहिलं. त्यानंतर 2012 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर जिल्हा परिषद निवडणूक लढवत तत्कालीन काँग्रेसचे उमेदवार मोहन सावंत यांचा पराभव केला आणि माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवला. मात्र, त्यानंतर झालेल्या माणगाव सरपंचपदाच्या थेट निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार जोसेफ डॉन्टस यांनी तामाणेकर यांचा पराभव केला. या पराभवानंतर रमाकांत तामाणेकर काही काळ सक्रिय राजकारणापासून दूर राहिले.

महाराष्ट्रात शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडली, पक्षाचे दोन गट निर्माण झाले. मात्र या राजकीय संघर्षातही रमाकांत तामाणेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतच राहण्याचा निर्णय घेतला. ते माजी आमदार वैभव नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणूनही ओळखले जात होते.

2026 च्या निवडणुकीत धक्कादायक पराभव अन् नाराजीची चर्चा

जानेवारी 2026 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत रमाकांत तामाणेकर यांनी ठाकरे शिवसेनेकडून माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत शिंदे शिवसेनेचे उमेदवार रुपेश कानडे यांनी त्यांचा पराभव केला. एकेकाळी याच मतदारसंघातून शिवसेनेचा झेंडा फडकवणाऱ्या तामाणेकर यांना यावेळी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि राजकीय परिस्थितीवरून ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली.

विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती कमी झाल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे तामाणेकर ठाकरे सेनेपासून अंतर राखत आहेत का? की ते नव्या राजकीय पर्यायाच्या शोधात आहेत? याबाबत तर्कवितर्कांना सुरुवात झाली.

 तामाणेकर शिंदे सेनेत गेले तर ठाकरे सेनेला बसू शकतो माणगाव खोऱ्यात सर्वात मोठा धक्का?

आता खरी चर्चा आहे ती रमाकांत तामाणेकर यांच्या संभाव्य राजकीय निर्णयाची! माणगाव खोऱ्यात एकेकाळी संघटनात्मक ताकद निर्माण केलेलं नेतृत्व म्हणून तामाणेकर यांची ओळख आहे. त्यामुळे तामाणेकर यांना सोबत घेणं हे शिंदे शिवसेनेसाठी माणगाव खोऱ्यात संघटनात्मक बळ वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरू शकतं. दुसरीकडे, तामाणेकर यांनी खरोखरच ठाकरे शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला, तर माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे सेनेला माणगाव खोऱ्यात मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आतापर्यंत ठाकरे सेनेत राहिलेलं नेतृत्व आता शिंदे सेनेच्या वाटेवर आहे का? निलेश राणे यांच्या माध्यमातून दत्ता सामंत हे रमाकांत तामाणेकर यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत का? आणि या सगळ्या राजकीय घडामोडींना रमाकांत तामाणेकर यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातून नवा संकेत मिळाला आहे का? या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देणार आहे. मात्र, एका वाढदिवसाच्या निमित्ताने माणगाव खोऱ्यातील राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे...!

निलेश राणे आणी दत्ता सामंत याची राजकीय खेळी?

 रमाकांत तामाणेकर यांचा माणगाव खोऱ्यातील 26 गावांमध्ये बऱ्यापैकी राजकीय टच आहे  माणगाव पंचायत समितीतून पाच वर्ष केलेलं काम आणि माणगाव जिल्हा परिषदेतून माणगाव खोऱ्यातील  26 गावात केलेलं रमाकांत तामाणेकर यांचे काम पाहता त्यांचे राजकीय वजन या भागात बऱ्यापैकी आहे.

माणगाव खोऱ्यामध्ये ठाकरे शिवसेनेला मानणारा मतदार आहे. याचबरोबर रमाकांत तामाणेकर यांनासुद्धा मानणारे काही मतदार आणि कार्यकर्ते आहेत. 2029 मध्ये लोकसभेचा आणि विधानसभेचा विचार करता विधानसभेसाठी लीड घेऊन एक हाती सीट काढण्यासाठी निलेश राणे यांचा प्रयत्न राहणार आहे.

माणगाव खोरे प्रत्येक वेळी निर्णायक मतदान करून विधानसभेवर कोण जाणार? ते ठरवत असतो. माणगाव खोऱ्यातील निर्णायक मते याच्यावरच विधानसभेचा आमदार कोण? हे अवलंबून असते. 2009 मध्ये नारायण राणे यांनी माणगाव खोऱ्यात लीड घेत वैभव नाईकांचा 25000 पेक्षा जास्त मताने पराभव केला होता. तर 2014 आणि 2019 मध्ये वैभव नाईकांनी टाळंबा धरणाचा इशू करून माणगाव खोऱ्यात सत्याधाऱ्यांना सुरूंग लावत एकगठ्ठा मते मिळवली होती आणि याचमुळे वैभव नाईक हे विजयी झाले होते. या सगळ्याचा विचार करता रमाकांत तामाणेकर सारखा एक मातब्बर चेहरा शिंदे शिवसेनेच्या अर्थात निलेश राणे आणि दत्ता सामंतांच्या गळाला लागला तर निलेश राणेंसाठी 2029 ची आमदारकीची लढाई सहज आणि सोपी होणार आहे. 

निलेश राणे आणि दत्ता सामंत हे एका दगडात दोन पक्षी मारत वैभव नाईकांना एक मोठा शह देत मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. असे झाले तर माणगाव खोऱ्यातील उरलीसुरली ठाकरे सेना संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदार निलेश राणे हे राजकीय गणिते बांधून कोणत्याही परिस्थितीत रमाकांत तामाणेकर यांना आपल्या पक्षात खेचण्याचा प्रयत्न करतील. दुसरीकडे पराभवाने नाराज झालेल्या रमाकांत तामाणेकर यांच्यासमोर सध्या दुसरा राजकीय पर्याय असल्याचे दिसत नाही. त्यात वैभव नाईक आणि त्यांच्यामध्ये राजकीय दरी निर्माण झाल्याची चर्चा आहे 

सध्या राजकीय दृष्ट्या विंजनवासात गेलेले रमाकांत तामाणेकर हे आपली राजकीय क्षमता लक्षात घेऊन कुठल्यातरी एका राजकीय पक्षाचा सहवास घेतील असे बोलले जाते. यात रमाकांत तामाणेकर यांची दत्ता सामंत यांच्याशी जवळीक वाढल्याची चर्चा आहे. यात गणेश चतुर्थीला दत्ता सामंत यांनी थेट आमदार निलेश राणेंच्या आदेशाने रमाकांत तामाणेकर यांचे थेट घर गाठत जवळीक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या एकंदर हालचालींना रमाकांत तामाणेकर कसा प्रतिसाद देतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रमाकांत तामाणेकर हे जर ठाकरे शिवसेना सोडून शिंदे सेनेत गेले, तर ठाकरे सेनेचा एक मोठा गट शिंदे सेनेत जाऊ शकतो आणि हा माजी आमदार वैभव नाईक यांना कुडाळ मालवण मतदार संघातील माणगाव खोऱ्यातील सगळ्यात मोठा राजकीय धक्का मानला जाऊ शकतो. यातून ठाकरे सेना सावरणे कठीण होईल आणि निश्चितच माणगाव खोऱ्याचा एक हाती बालेकिल्ला निलेश राणे आणि दत्ता सामंत यांच्या हाती येईल. तो एक मोठा सेटबॅक ठाकरे सेनेला बसू शकतो. त्यामुळे आमदार निलेश राणे कोणत्याही परिस्थितीत आलेली संधी सोडणार नाहीत असं एकंदर चित्र तयार झाल्याचं जाणकारांना वाटतं.

आता चेंडू रमाकांत तामाणेकर यांच्या कोर्टात?

एका बाजूला ठाकरे सेनेशी असलेली जुनी निष्ठा, दुसऱ्या बाजूला शिंदे सेनेच्या नेत्यांशी वाढत चाललेली जवळीक आणि त्यातच जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवाची पार्श्वभूमी. या सगळ्या घटनांमुळे रमाकांत तामाणेकर यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे आता संपूर्ण माणगाव खोऱ्याचं लक्ष लागलं आहे. रमाकांत तामाणेकर खरंच शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार का? की ही केवळ राजकीय जवळीक आहे? तामाणेकर यांच्या एका निर्णयाने माणगाव खोऱ्यातील राजकीय समीकरणं बदलणार का? एका वाढदिवसाने निर्माण केलेली ही राजकीय चर्चा आता पक्षप्रवेशाच्या घोषणेपर्यंत पोहोचते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे!