LIVE UPDATES

मांगवलीतील युवकाचा नालासोपाऱ्यात पावसाने घेतला बळी

भाजी आणण्यासाठी गेलेला दिलीप नारकर तुंबलेल्या पाण्यात मृतावस्थेत आढळला
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 08, 2026 19:54 PM
views 54  views

वैभववाडी : मुंबई उपनगरांसह परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने वैभववाडी तालुक्यातील मांगवली गावातील युवकाचा बळी घेतला. मांगवली येथील दिलीप राजाराम नारकर (वय २८) यांचा नालासोपारा येथे तुंबलेल्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे नारकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मांगवली गावात हळहळ व्यक्त होत आहे.

दिलीप नारकर हे पत्नी दिपाली यांच्यासह नालासोपारा येथे भाड्याच्या घरात राहत होते, तर त्यांची आई मांगवली येथे वास्तव्यास आहे. सोमवारी (ता. ६) मुसळधार पावसामुळे ते कामावर गेले नव्हते. सायंकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने ते भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नीने नातेवाईकांना याची माहिती दिली.

यानंतर नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. अखेर नालासोपारा रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि आकस्मिक मृत्यूची नोंद केली. शवविच्छेदनानंतर मंगळवारी रात्री नालासोपारा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिलीप यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन विवाहित बहिणी आणि दोन आत्या असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे मांगवली गावासह वैभववाडी तालुक्यात शोककळा पसरली आहे.