
कणकवली : कणकवली-नरडवे रोडवरील रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावर मोठ मोठे, जीवघेणे खड्डे पडल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. सततच्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. याच ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून प्रवास करणारी एक महिला खड्ड्यात पडून जखमी झाल्याची घटना देखील घडली असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले. या अपघातामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
या मार्गावरून दररोज रेल्वे स्थानकाकडे जाणारे प्रवासी, स्थानिक नागरिक तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. त्यामुळे या धोकादायक खड्ड्यांमुळे आणखी गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने पाहणी करून जीवघेणे खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.












