LIVE UPDATES

ऐतिहासिक क्षण ; राजाश्रय मिळाला

दशावतार कलावंतांचा आनंद द्विगुणित
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 08, 2026 19:18 PM
views 234  views

सिंधुदुर्ग : कोकणची कला असणाऱ्या दशावतार व दशावतारी कलावंतांची व्यथा, प्रलंबित मागण्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दिरंगाईवरून आमदार निलेश राणेंनी  सभागृहात आक्रमक होत लक्षवेधी मांडली. यावेळी दशावतार लोककलेच्या संवर्धनासाठी राज्य सरकारच्यावतीने सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी ऐतिहासिक घोषणा केली. दशावतार आणि अन्य पाच लोककलांसाठीचे एकूण अनुदान २ कोटी २२ लाख रुपयांवरून ४ कोटी ४० लाख रुपये करण्याची घोषणा मंत्री शेलार यांनी केली. तसेच पालकमंत्री नितेश राणे यांनी देखील यापूर्वी बैठक घेत 'सिंधुरत्न योजने'तून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले होते. 'कोकणसाद'ने याबाबत वृत्त प्रसारित केल्यानंतर न्याय मिळाल्याचे सांगत दशावतार कलावंतांनी ऋण व्यक्त केलेत.

कोकणसादच्या प्रधान कार्यालयात भेट देत दशावतार कलावंतांनी आज ऋण व्यक्त केले. कोकणसादचे संचालक - संपादक संजय ढवळीकर, मुख्य संपादक सागर चव्हाण, मुख्य प्रतिनिधी विनायक गांवस यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांनी आभार मानले. सिंधुदुर्गच्या दशावतार कलावंतांची व्यथा मांडणारा व्हिडिओ 'कोकणसाद'ने प्रसारित केल्यानंतर आम्हाला न्याय मिळाला‌. सर्वप्रथम पालकमंत्री नितेश राणे यांनी बैठक घेतली होती. सिंधुरत्न योजनेतून निधी देण्याची ग्वाही दिली. तर आज आमदार निलेश राणे यांनी थेट सभागृहात लक्षवेधी मांडली. त्यामुळे आम्हाला आज न्याय मिळाला असून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणेंचे धन्यवाद देतो. तसेच कोकणसादचे आम्ही ऋण व्यक्त करतो, अशी भागवा पारंपरिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष पुरुषोत्तम कोचरेकर, जिल्हा सल्लागार दत्तप्रसाद शेणई यांनी व्यक्त केली. यावेळी पारंपरिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्गचे कुडाळ तालुका अध्यक्ष चारूदत्त तेंडोलकर, धोंडू रेडकर, मालवण कलाकार संघटना सल्लागार सुधीर तांडेल, गौरव शिर्के, मोरेश्वर सावंत, महेंद्र कुडव, विनायक येरागी, योगेश कोंडुरकर, शिवप्रसाद मेस्त्री, सिद्धेश मुणनकर, निळकंठ सावंत, अर्जून परब, सागर गांवकर, उदय मोर्ये, विनायक सावंत, बंटी कांबळी, किसान नेमळेकर आदींसह दशावतार कलावंत उपस्थित होते.