LIVE UPDATES

दोडामार्गातील अवैध माती उत्खननाचा मुद्दा जयंत पाटीलांनी विधानसभेत मांडला

कोकणसाद LIVE ने सर्वप्रथम समोर आणला होता विषय
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 08, 2026 20:11 PM
views 59  views

दोडामार्ग : पर्यावरणाच्यादृष्टीने संवेदनशील असलेल्या दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध माती उत्खननाचा मुद्दा आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला. रात्रीच्या वेळी जेसीबी आणि पोकलेनच्या साहाय्याने डोंगरांचे उत्खनन केले जात असून शेकडो डंपरमधून बेकायदेशीररीत्या मातीची वाहतूक सुरू आहे. या प्रकारामुळे शासनाचा महसूल बुडत असून संबंधित यंत्रणेकडून होत असलेल्या दुर्लक्षाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. हाच विषय कोकणसाद LIVE ने सर्वप्रथम समोर आणला होता. 

आ. पाटील म्हणाले की, जैवविविधता आणि वनसंपदेसाठी ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू आहे. दोडामार्ग तालुक्यात रात्रीच्या वेळी यंत्रसामग्रीच्या साहाय्याने डोंगरच्या डोंगर पोखरण्याचे प्रकार सुरू असून, नैसर्गिक संपत्तीचे नुकसान होत आहे. उत्खननातून काढलेली माती कोणत्याही वैध परवानगीशिवाय शेकडो डंपरमधून वाहतूक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. इतक्या मोठ्या प्रमाणात हा प्रकार सुरू असताना महसूल प्रशासनाने प्रभावी कारवाई केलेली दिसत नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणा या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अवैध उत्खननामुळे शासनाचा महसूल बुडत असून पर्यावरणावरही त्याचे गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच या प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या किंवा संबंधितांना मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली.