
ओरोस : गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने ओरोस परिसरात जोरदार वाऱ्यासह जोरदार आगमन केले आहे. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे तापमानात घट होऊन वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना पाणीटंचाईचे सावट असतानाच पावसाच्या या आगमनाने स्थानिक नागरिक आणि बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कडक ऊन आणि उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र, आज अचानक आलेल्या या सरींमुळे काही काळ उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या थंड हवेमुळे परिसरात प्रसन्न वातावरण पसरले आहे.पावसाची ही उपस्थिती अशीच कायम राहिल्यास पाण्याची येणाऱ्या काळात टंचाई कमी होण्यास मदत होईल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.











