LIVE UPDATES

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला चिरडून सत्तेचा गैरवापर

राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला फटकारले; आंदोलनाला दिला पूर्ण पाठिंबा
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 16, 2026 13:27 PM
views 41  views

मुंबई :  शिक्षण क्षेत्रातील नीट (NEET) परीक्षेतील कथित घोटाळा आणि लडाखच्या हक्कासाठी उपोषणाला बसलेले प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज १९ वा दिवस असून, त्यांच्या खालावलेल्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. "ज्या संस्थांनी निष्पक्ष वागायला हवे त्यांना ताब्यात घेतले आहे. निवडणुका मॅनेज केल्या जात आहेत आणि बहुसंख्य माध्यमे सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत," असे गंभीर आरोप त्यांनी केले. सोनम वांगचुक यांच्यासारख्या आंदोलकांना देशद्रोही ठरवून किंवा त्यांच्या आंदोलनाला चिरडून सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

NEET परीक्षेतील गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे, याकडे लक्ष वेधताना राज ठाकरे म्हणाले की, "व्यापम घोटाळ्यापासून ते नीटपर्यंत सर्वच परीक्षांमध्ये गैरप्रकार होत आहेत. हा विषय राजकीय नसून सामाजिक आहे. यात भाजपचे समर्थक असोत वा विरोधक, सर्वांच्याच मुलांचे नुकसान झाले आहे. मंत्र्यांची हकालपट्टी करून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, ही वांगचुक यांची मागणी अत्यंत रास्त आहे."

पंतप्रधानांच्या प्रदीर्घ कार्यकाळाचा उल्लेख करत राज ठाकरेंनी टोला लगावला, "पंडित नेहरूंपेक्षा जास्त दिवस सत्तेत बसल्याचा आनंद साजरा करण्यापेक्षा, आज सोनम वांगचुक यांच्यासारख्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेऊन कृती केली, तरच त्या आकड्याला अर्थ आहे. अन्यथा, अशा आकड्यांचा देशाला काहीही उपयोग नाही."

सोशल मीडियाच्या पलीकडे जाऊन आंदोलनाची गरज

राज ठाकरे यांनी नागरिकांना आणि तरुणांना आवाहन केले की, "आजची सिव्हिल सोसायटी केवळ सोशल मीडियावर लाईक्स आणि शेअरमध्ये अडकली आहे. लोकांच्या मतांचा अपमान करण्याचा माज सध्या सरकारला आला आहे. जर आपण स्क्रीनच्या बाहेर येऊन रस्त्यावर उतरून प्रश्न विचारले नाहीत, तर ही शांतता सरकार स्मशान शांततेकडे नेईल."

सोनम वांगचुक यांच्या मागण्यांशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे सहमत असल्याचे स्पष्ट करत राज ठाकरे म्हणाले की, "केवळ नीट नाही, तर सर्वच परीक्षांमध्ये पारदर्शकता हवी आणि दोषी मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. एक राजकीय पक्ष म्हणून आम्ही या आंदोलनाच्या पाठीशी पूर्ण शक्तीनिशी उभे आहोत."

​शेवटी, केवळ सोशल मीडियावरील प्रतिक्रियांवर अवलंबून न राहता, जनतेने संघटित होऊन लोकशाही मार्गाने व्यवस्थेला जाब विचारला पाहिजे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.