LIVE UPDATES

कै. डॉ. शरयू आसोलकर यांच्या नावे कविता पुरस्कार

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 21, 2026 07:03 PM
views 23  views

सावंतवाडी : कवयित्री कै. डॉ. शरयू आसोलकर यांच्या नावे दरवर्षी कविता पुरस्कार देण्यात येईल अशी घोषणा येथील श्रीराम वाचन मंदिरच्या वतीने करण्यात आली. तसेच डॉ. आसोलकर यांच्या कवितांची सांगोपांग चर्चा करणाऱ्या परिसंवादाचे लवकरच सिंधुदुर्ग साहित्य संघ व अन्य साहित्य संस्थांच्या विद्यमाने आयोजन करण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. सावंतवाडी येथे आयोजित डॉ. शरयू आसोलकर यांच्या शोकसभेत या बाबी जाहीर करण्यात आल्या.

शोकसभेस सावंतवाडी परिसरासह कुडाळ, कणकवली, वेंगुर्ला, ओरस, गोवा आदी ठिकाणांहून अभ्यासक, साहित्यिक, प्राध्यापक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. आसोलकर यांच्या विविध आठवणींना उजाळा देत त्यांच्या कवितांचे वाचन करण्यात आले. त्यांच्या कवितेच्या वैशिष्ट्यांवर व वाङ्मयीन योगदानावर उपस्थितांनी सखोल चर्चा केली. डॉ. आसोलकर यांच्या निधनाच्या आदल्या दिवशीच दिवंगत झालेल्या मूळ मालवण येथील कवयित्री शुभांगी थोरात यांनाही या शोकसभेत कविता वाचनातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या शोकसभेस लेखक प्रवीण बांदेकर यांच्यासह कवयित्री उषा परब, अजय कांडर, संध्या तांबे, वीरधवल परब, विठ्ठल कदम, डॉ. स्मिता सुरवसे, मधुकर मातोंडकर, भरत गावडे, संदीप निंबाळकर, नंदू पाटील, विजयालक्ष्मी चिंडक, कल्पना बांदेकर, श्वेतल परब, संतोष वालावलकर, संतोष पाथरवट, वैदेही आरोंदेकर, स्मिता खानोलकर, हरिहर वाटवे, प्रा. सुभाष गोवेकर, कवी प्रा. गोसावी, तन्वी परब, प्रा. नंदीहळ्ळी, पत्रकार तसेच साहित्यप्रेमी उपस्थित होते.