LIVE UPDATES

स्पर्धा परीक्षांमध्ये पी. एम. श्री आदर्श शाळेचा झंझावात

आराध्य राज्य गुणवत्ता यादीत १३ वा; आयुषसह दहा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र, सैनिक व नवोदय परीक्षेतही उज्ज्वल यश
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 04, 2026 14:18 PM
views 41  views
#kokansadlive#news update#konkan update#

आराध्य राज्य गुणवत्ता यादीत १३ वा; आयुषसह दहा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र, सैनिक व नवोदय परीक्षेतही उज्ज्वल यश

देवगड (प्रतिनिधी)

जामसंडे येथील पी. एम. श्री आदर्श शाळा (जोशी विद्यामंदिर) जामसंडे नं. १ च्या विद्यार्थ्यांनी यावर्षी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये दैदिप्यमान यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. पाचवी शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल आणि नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण जामसंडे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.यामध्ये आराध्य दिनेश राणे याने पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादीत १३ वा क्रमांक, सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय आणि देवगड तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. याशिवाय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत २७१ गुण मिळवत पात्रता सिद्ध केली असून, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत ९६.२५ टक्के गुण मिळवून आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे.त्याचप्रमाणे आयुष दिनेश राणे यानेही पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ वा आणि देवगड तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला. सैनिक स्कूल व नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतही त्याने उल्लेखनीय यश मिळवून आपल्या गुणवत्तेची छाप पाडली.यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचे एकूण दहा विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये समिक्षा काकतकर, योगेश घाडी, पार्थ घाडी, प्रणव घाडी, वेदिका पवार, ओवी घाडी, भूमिका घाडी, प्रथा सावंत यांच्यासह इतर विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी शिनगारे, केंद्रप्रमुख सुदाम जोशी, मुख्याध्यापिका सुधा घाडी, शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकवर्ग यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक दिनेश दळवी तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंदाचे सातत्यपूर्ण व मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे जामसंडे परिसरात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.