
सातुळी- बावळाट उपसरपंचांचे गंभीर आरोप
सावंतवाडी :
सातुळी बावळाट ग्रामपंचायतीत विकासकामांच्या अंमलबजावणीत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत उपसरपंच स्वप्निल सुभाष परब यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.तक्रारीनुसार, चिलेवाडी येथे स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामासाठी अंदाजपत्रकात तब्बल १८ पोल मंजूर असताना प्रत्यक्षात केवळ ५ ते ६ पोल उभारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे अद्याप स्ट्रीट लाईट सुरूही करण्यात आलेली नसताना ठेकेदाराला बिलाची रक्कम अदा करण्यात आल्याचा गंभीर आरोप उपसरपंच श्री. परब यांनी केला आहे. या कामाची कोणतीही चर्चा मासिक सभेत झाली नसल्याचे तसेच उपसरपंच आणि इतर सदस्यांना विश्वासात न घेता संपूर्ण प्रक्रिया पार पडल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. याशिवाय बावळाट–चिलेवाडी रस्ता डांबरीकरण व खडीकरणाच्या कामातही गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित फाईलमध्ये जोडलेली छायाचित्रे ही त्या रस्त्याची नसून दुसऱ्याच रस्त्याची असल्याचे निदर्शनास आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच मोजमाप पुस्तिका फाईलमध्ये नसतानाही बिल मंजूर करून ठेकेदाराच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आल्याचा संशय व्यक्त करत उपसरपंच परब यांनी सरपंचांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. ग्रामपंचायतीतील विकासकामे, एमबी, बिले आणि आर्थिक व्यवहारांबाबत मासिक सभेत चर्चा केली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले जात असल्याने ग्रामपंचायतीतील पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.तसेच मासिक सभेचे नियोजनही नियमांनुसार होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. सभेचा अजेंडा सात दिवस अगोदर देणे अपेक्षित असताना तो अवघ्या एक-दोन दिवस आधी व्हॉट्सॲपवर पाठविला जात असल्याने सदस्यांना नियोजन करता येत नाही. परिणामी काही मासिक सभा सदस्यांच्या गैरहजेरीमुळे तहकूब झाल्याचाही दावा करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी आणि ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शकपणे चालवावा, अशी मागणी उपसरपंच स्वप्निल परब यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.











