
सिंधुदुर्गनगरी : अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या धरणातील पाणीसाठा वाढल्याने ४ जुलै २०२६ पासून धरणातून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. त्यामुळे धरणाखालील असणी नदीतील पाणीपातळी वाढण्याची शक्यता असून नदीकाठच्या ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जलसंपदा विभागाने प्रसिद्ध केलेल्या सार्वजनिक निवेदनानुसार, अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा १५१.२० मीटर पातळीपर्यंत भरला असून, कोणत्याही क्षणी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होऊ शकतो. त्यामुळे ४ जुलैपासून पावसाळा संपेपर्यंत नदीतील पाणीपातळी कधीही वाढू शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
नदीपात्रात अनावश्यक वावर टाळावा, नदी ओलांडण्याचा प्रयत्न करू नये तसेच जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या संदर्भातील सूचना जिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, दक्षिण कोकण पाटबंधारे मंडळ, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रशासन तसेच संबंधित गावांचे तलाठी, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांनाही देण्यात आल्या आहेत. विशेषतः मांगवली, बेंगरस, हेत (ता. वैभववाडी), केळवली-मठ (ता. राजापूर) तसेच पिंपळी-खारेपाटण (ता. कणकवली) परिसरातील नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उपकार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभागीय पथक, आंबडपाल यांनी हे सार्वजनिक निवेदन जारी केले आहे.










