
सावंतवाडी : माझ्या विरोधात अनेक षडयंत्र रचवण्यात आली. पण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वकिलांनी एकीचे बळ दाखवले. त्यात करून सावंतवाडी वकील संघटनेची एकी आगळी वेगळी आहे. सावंतवाडीत बाहेरची व्यक्ती येऊन माझ्या विरोधात वकीलांना भडकवत होती. पण, सर्व वकिलांनी त्यांचे षडयंत्र हाणून पाडले असं मत महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनचे नवनिर्वाचित सदस्य ॲड. संग्राम देसाई यांनी व्यक्त केले. सावंतवाडी दिवाणी न्यायालयात आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मला सावंतवाडीतून मिळाले. त्यामुळे मी सावंतवाडीच्या सर्व वकील बांधवांचा ऋणी आहे. असेच एकीचे बळ कायम ठेवा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वकिलांच्या हिताच्या दृष्टीने मी काम करणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सावंतवाडी तालुका वकील संघटनेच्यावतीने आज सावंतवाडी वकील संघटनेच्या चेंबरमध्ये सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ॲड संग्राम देसाई यांचा शाल व श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक, ॲड. दिलीप नार्वेकर, ॲड. सुभाष पणदूरकर, तालुका अध्यक्ष बालाजी रणशूर व तालुका बारचे सदस्य उपस्थित होते.











