
दोडामार्ग : वझरे परिसरातील एका कंपनीसाठी कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्ट कंपनीचे डंपर चालक हे वारंवार मद्यधुंद अवस्थेत वाहने चालवत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाहतूक नियमांची सातत्याने पायमल्ली होत असल्याचा आरोप करत संबंधित कंपनीने ट्रान्सपोर्ट कंपनीला कायम येथून हद्दपार करण्याची मागणी केली जात आहे. मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी हेडलाईट न लावता कोळसा वाहतूक करणाऱ्या एका डंपरवर पोलिसांनी कारवाई केली होती. मात्र, त्या घटनेनंतरही चालकांच्या वर्तनात कोणताही बदल झालेला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांची कारवाई केवळ दिखाऊ ठरल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही चालक मद्यप्राशन करूनच जड वाहने चालवत असल्याने रस्त्यावरून प्रवास करणारे नागरिक, दुचाकीस्वार तसेच पादचारी यांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय वेगमर्यादेचे उल्लंघन, बेफाम वाहनचालक आणि वाहतूक नियमांकडे केले जाणारे दुर्लक्ष यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित ट्रान्सपोर्ट कंपनीने आपल्या चालकांवर प्रभावी नियंत्रण ठेवावे आणि मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र संबंधित ट्रान्सपोर्ट कंपनीने मुजोरी दाखवत ही वाहतूक सुरू ठेवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, परिस्थितीत तातडीने सुधारणा झाली नाही आणि स्थानिकांच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्नांकडे दुर्लक्ष सुरूच राहिले, तर संबंधित ट्रान्सपोर्ट कंपनीविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी पोलिस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.










