
सिंधुदुर्गनगरी : एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त ओरोस बसस्थानक परिसरात मंगळवारी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर यांच्या हस्ते झालेल्या या उपक्रमात बसस्थानक परिसरात ५० विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. राज्यभरात राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहिमेचा हा एक भाग असून, यंदा एसटी महामंडळाकडून ७८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 'हरित भविष्यासाठी एक पाऊल पुढे' या संकल्पनेतून १४ जुलै रोजी राज्यातील बसस्थानके, आगार आणि विभागीय कार्यालय परिसरातील सुमारे एक हजार ठिकाणी वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन केले. पर्यावरण संवर्धनास चालना देणे आणि हरित परिसर निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
ओरोस बसस्थानकात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक बी. सी. गुरखे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक जयेंद्र सासोलकर, प्रवासी वाहतूक संघटनेचे पदाधिकारी, एसटी कर्मचारी तसेच प्रवासी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारत लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला. एसटीच्या वर्धापनदिनानिमित्त पर्यावरणपूरक उपक्रम राबविल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.










