LIVE UPDATES

महिलेचा पाठलाग, अत्याचार आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल

संशयिताला अटक
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 06, 2026 10:43 AM
views 657  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

कुडाळ : महिलेचा पाठलाग करून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणे आणि तिचे अश्लील चित्रीकरण करून तो व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी योगेश सुरेश चव्हाण (३८, रा. माणगाव-कट्टावाडी) या संशयिताला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (भारतीय न्याय संहितेचे नवीन कायदे - BNS) कलम ७४, ७५(२), ६४(२)(m) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० च्या कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित योगेश चव्हाण याने फिर्यादी महिलेचा १ मार्च २०२५ ते ३० जून २०२६ या कालावधीत तिच्या इच्छेविरुद्ध सातत्याने पाठलाग केला. एका चेंजिंग रूममध्ये तिला पकडून तिच्याशी लगट केली. त्यानंतर तिच्या घरी जाऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच, हा प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगण्याची धमकी देऊन तिचे नकळत अश्लील चित्रीकरण केले आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला, असे त्या महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जयदीप पाटील यांनी फिर्यादीत नमूद केलेल्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी संशयित योगेश याच्यावर वरीलप्रमाणे गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्याला सोमवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कुडाळ पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक विकास बडवे करीत आहेत.