
सिंधुदुर्ग : युवकांच्या सामाजिक सहभागातून आनंद, आपुलकी आणि माणुसकीची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने YONE Foundation च्या वतीने जीवन आनंद संस्था संचलित पणदूर येथील संविता आश्रमात ‘Mission आनंदाचे सूर’ या विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. संगीत, मनोरंजक खेळ आणि संवाद यांच्या माध्यमातून आश्रमातील रहिवाशांसोबत आनंदाचे क्षण साजरे करण्यात आले.
YONE Foundation चे संस्थापक समीर अशोक जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने हा उपक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात शायरी आणि संगीताने झाली. त्यानंतर आश्रमातील रहिवाशांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. युवकांनी प्रत्येकाशी संवाद साधत त्यांना कार्यक्रमात सहभागी करून घेतले. संगीत, हास्यविनोद आणि सामूहिक सहभागामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या उपक्रमाचा उद्देश केवळ मनोरंजन करणे हा नसून आश्रमातील रहिवाशांना वेळ देणे, त्यांच्या भावना जाणून घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांना आपलेपणाची जाणीव करून देणे हा होता.
‘समाजसेवा म्हणजे केवळ आर्थिक मदत नव्हे, तर एखाद्याला आपला वेळ देणे, त्यांचे म्हणणे मनापासून ऐकून घेणे आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण निर्माण करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे,’ हा मोलाचा सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
YONE Foundation चा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा पहिलाच सामाजिक उपक्रम असून संस्थेच्या सामाजिक कार्याच्या विस्ताराच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. युवकांमधील कला, संगीत, ऊर्जा आणि सामाजिक जाणीव यांचा उपयोग समाजातील विविध घटकांच्या आनंदासाठी व्हावा, या हेतूने भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
For the Youth. By the Youth. With the Youth.’ या ब्रीदवाक्याने प्रेरित YONE Foundation युवकांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी कार्यरत आहे. संविता आश्रमातील या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीसोबतच माणुसकीचे आणि आपुलकीचे सुंदर दर्शन घडले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








