
देवगड : ज्येष्ठ समाजसेवक व देवगड तालुक्यातील सुप्रसिद्ध आंबा बागायतदार विनायक पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त वरेरी येथील महात्मा गांधी विद्यामंदिर, सांस्कृतिक भवन येथे आयोजित महारक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रुपेश पारकर मित्रमंडळ, ग्रामपंचायत वरेरी व समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात एका महिला रक्तदात्यासह ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे, वरेरी गावाच्या इतिहासात प्रथमच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
प्रशासक सरपंच सौ. प्रिया गोलतकर यांनी स्वतः रक्तदान करून आदर्श घालून दिला. रुपेश पारकर यांनी रक्तदान केले, तर मयुरेश पारकर याने प्रथमच रक्तदान केले. सिंधुदुर्ग रक्तमित्र प्रतिष्ठान (शाखा देवगड) यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी उपसरपंच सुभाष राणे, रुपेश पारकर, मुकेश पारकर, प्रविण सावंत, प्रकाश जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रक्तदात्यांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त डॉ. प्रफुल्ल यांचाही सत्कार करण्यात आला. शेवटी प्रशासक सरपंच सौ. प्रिया गोलतकर यांनी सर्व रक्तदाते, एसएसपीएम पडवे रक्तपेढीची टीम, सिंधुदुर्ग रक्तमित्र प्रतिष्ठान, आयोजक व ग्रामस्थांचे आभार मानले.










