LIVE UPDATES

जलसंधारणासाठी तळवडे जोशीवाडीत विद्यार्थ्यांनी श्रमदानातून बांधला बंधारा

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 08, 2026 19:31 PM
views 16  views

सावंतवाडी : जलसंधारणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून समजावे आणि परिसरातील भूजलपातळी वाढण्यास हातभार लागावा, या उद्देशाने श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळवडे आणि तळवडे ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने तळवडे जोशीवाडी येथील ओढ्यावर कच्चा वनराई बंधारा बांधण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात इयत्ता नववीचे २५ आणि अकरावी-बारावीचे २५ अशा एकूण ५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले.

बंधारा बांधकामाचा शुभारंभ सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती श्रीमती सुषमा सुधाकर जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे कृषी विकास अधिकारी श्री. कोळप, मोहीम अधिकारी श्री. माने, तळवडे ग्रामपंचायतीचे प्रशासक एकनाथ सावंत, शिक्षण प्रसारक मंडळ, तळवडेचे सदस्य सुधीर सावंत, सामाजिक कार्यकर्ते दादा परब, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, पर्यवेक्षक दयानंद बांगर, शिक्षिका मिलन देसाई, शिक्षक अंकुश चौरे, किशोर नांदिवडेकर, शिक्षकेतर कर्मचारी सत्यवान परब, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच आशाताई यांच्यासह स्थानिक ग्रामस्थही यावेळी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने श्रमदान करत बंधाऱ्याचे काम पूर्ण केले. विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष सहभागामुळे जलसंधारणाबरोबरच श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

लोकसहभागातून जलसंधारणाचा संदेश विद्यार्थ्यांनी श्रमदानातून उभारलेला हा बंधारा पावसाचे पाणी अडविण्यास उपयुक्त ठरणार असून, त्यामुळे परिसरातील भूजलपातळी वाढण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांमध्ये जलसंधारणाची जाणीव निर्माण करण्यासोबतच ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला कृतीची जोड देणारा हा उपक्रम ठरला. भविष्यात अशा उपक्रमांना लोकसहभाग मिळाल्यास परिसरातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.