
सिंधुदुर्गनगरी : स्मार्ट मीटर बसविण्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या ओरोस पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शुक्रवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थान कार्यालयात तब्बल चार तास घेराव घातला. सकाळी ११ वाजता सुरू झालेली बैठक दुपारी ३ वाजेपर्यंत चालली. अखेर उपकार्यकारी अभियंता कामथे यांनी टप्प्याटप्याने जुने मीटर चाचणीसाठी पुन्हा बसवून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
स्मार्ट मीटर बसविण्याचा धोरणाला कडाडून विरोध करत आज शुक्रवारी ओरोस गावातील ग्रामस्थांनी महावितरणच्या ओरोस उपविभागाच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयात धडक दिली. यावेळी ॲड. नंदन वेंगुर्लेकर, सरपंच पांडुरंग मालवणकर, नागेश ओरोसकर, सुहास परब, उदय दळवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ओरोस पंचक्रोशीतील एकूण वीज ग्राहकांची संख्या, त्यापैकी किती ग्राहकांचे मीटर बदलण्यात आले याची माहिती मागितली. स्मार्ट मीटर बसविण्याचा ठेका दिलेल्या कंपनीच्या प्रतिनिधींना मागील बैठकीत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र ते गैरहजर राहिल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
चर्चेदरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शासन निर्णय व परिपत्रकांचा आधार घेत स्मार्ट मीटर बसविणे आवश्यक व बंधनकारक असल्याचे सांगितले. यावर ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी केंद्र शासनाच्या इलेक्ट्रिसिटी ॲक्टमधील तरतुदींचा दाखला देत आक्षेप नोंदविला. ग्राहक कोणत्याही प्रमाणित कंपनीचा मीटर वापरू शकतो, एकाच कंपनीचा मीटर घेणे बंधनकारक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी तालुक्यात काही ग्राहकांनी स्वतः मीटर खरेदी करून बसविले असून ते महावितरणनेच जोडून दिल्याची उदाहरणेही त्यांनी मांडली. याप्रकरणी ग्राहक पंचायतीचे लक्ष वेधण्यात येणार असून सीजीआरएफ तसेच विद्युत लोकपाल यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीअंती उपकार्यकारी अभियंता राजेंद्र कामथे यांनी टप्प्याटप्याने जुने मीटर बसवून देण्याचे लेखी आश्वासन दिले. पहिल्या टप्प्यात पाच मीटर बदलण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले.
दरम्यान, स्मार्ट मीटर धोरणाला विरोध कायम ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला असून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी रविवार, २१ जून रोजी सायंकाळी ४ वाजता ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती ग्रामस्थ नागेश ओरोसकर यांनी दिली.
मीटर ‘चोरी’ची तक्रार देणार
ओरोस पंचक्रोशीत सुमारे २० हजार वीज ग्राहक असून त्यापैकी जवळपास ८ हजार ग्राहकांचे जुने मीटर कोणतीही पूर्वसूचना न देता काढून स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. हा प्रकार मीटर चोरीसारखाच असल्याचे सांगत सोमवारी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी सरपंच पांडुरंग मालवणकर यांनी दिली. ग्रामस्थांच्या संमतीशिवाय काढून नेण्यात आलेले जुने मीटर परत मिळावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.










