
सिंधुदुर्गनगरी : नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा आणि शिक्षणाविषयी आत्मीयता निर्माण करणारा शाळा प्रवेशोत्सव जीवन शिक्षण विद्यामंदिर, कसाल नं. १ येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा प्रवेशोत्सव खऱ्या अर्थाने एक अविस्मरणीय सोहळा ठरला.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना शुभेच्छा देताना सांगितले की, "जीवन शिक्षण विद्यामंदिर, कसाल नं. १ या शाळेत विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर असलेली उपस्थिती, पालकांचा सहभाग, शाळा व्यवस्थापन समितीची तळमळ आणि शिक्षकांचे समर्पित कार्य पाहून समाधान वाटते. शिक्षक, पालक आणि व्यवस्थापन समिती यांच्यातील आपुलकीचे नाते हीच या शाळेची खरी ताकद आहे. या शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जिल्हा परिषद सदैव पाठीशी राहील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात सोमवारपासून झाली असून, जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्याच अनुषंगाने कसाल बाजारपेठेतील जीवन शिक्षण विद्यामंदिर, कसाल नं. १ या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.
ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. शाळेच्या प्रवेशद्वारावर चिमुकल्यांचे औक्षण करण्यात आले. त्यांच्या कोवळ्या पावलांचे ठसे घेऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची मंगल सुरुवात करण्यात आली. फुलांच्या वर्षावात आणि टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे स्वागत होत असताना पालकांच्या चेहऱ्यावरही समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. या प्रसंगी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेली पाठ्यपुस्तके तसेच शालेय गणवेशांचे वितरण करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत शिक्षणाच्या प्रवासाला सकारात्मक सुरुवात करून देण्यात आली.
या कार्यक्रमाला कसालचे सरपंच राजन परब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लवू म्हाडेश्वर, पंचायत समिती सदस्य बाळा कांदळकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्या सौ. तृप्ती नारकर, संजय वाडकर, केंद्रप्रमुख श्री. हरमलकर, मुख्याध्यापिका सौ. स्नेहा पवार, पोलीस पाटील अनंत कदम, मामा कसालकर, नंदू आंबेरकर यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका सौ. स्नेहा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत गोडी निर्माण करण्याबरोबरच शाळेशी भावनिक नाते जोडण्याचा संदेश या प्रवेशोत्सवातून देण्यात आला.
आनंददायी शिक्षणाची सुरुवात, संस्कारमय वातावरणाची जोड आणि समाजाच्या सहभागातून उभा राहणारा शिक्षणोत्सव" अशीच भावना जीवन शिक्षण विद्यामंदिर, कसाल नं. १ येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रवेशोत्सवातून अनुभवायला मिळाली. चिमुकल्यांच्या हास्याने आणि पालकांच्या समाधानाने उजळून निघालेला हा सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला.










