
सावंतवाडी : स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला अभिवादन करत देशभक्तीची प्रेरणा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय ‘ऑगस्ट क्रांती प्रेरणा महोत्सव–२०२६’ या देशभक्ती कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव शनिवार, ८ ऑगस्ट रोजी यशवंतराव भोसले सैनिक स्कूल, भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथे संपन्न होणार आहे.या महोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इयत्ता ५ वी ते ७ वी मधील विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर समूहगीत, देशभक्तीपर समूहनृत्य आणि देशभक्तीपर समूह नाट्यछटा, लघुनाट्य अशा तीन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक स्पर्धेसाठी ६ ते १५ विद्यार्थ्यांचा स्वतंत्र संघ आवश्यक असून सादरीकरणासाठी ५ मिनिटांचा कालावधी देण्यात येईल. स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक तसेच इंग्रजी माध्यमाच्या अनुदानित, विनाअनुदानित अशा सर्व शाळा सहभाग घेऊ शकतील. प्रत्येक शाळेला एक, दोन किंवा तिन्ही स्पर्धांमध्ये सहभाग घेता येणार असून प्रत्येक स्पर्धेसाठी स्वतंत्र संघ असणे आवश्यक आहे. नाव नोंदणीची अंतिम तारीख ५ ऑगस्ट असून इच्छुक शाळांनी वेळेत नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच उत्तेजनार्थ क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. याशिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात येईल. देशभक्ती, सांघिक भावना, सर्जनशीलता आणि कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या या जिल्हास्तरीय महोत्सवात जिल्ह्यातील सर्व शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन भोसले सैनिक स्कूलच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी ९१६७०७७९४० या क्रमांकावर संपर्क साधावा.










