
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील जांभवडे-खोचरेवाडी येथील पूल खचल्याचो घटना ताजी असताना जांभवडे जि. प. शाळेनजीक असलेला साकव (लोखंडी पूल) आज सकाळी कोसळल्याची घटना घडली. या साकवाच्या प्लेटस व आणि रेलिंग कोसळले असून सुमारे ३०० लोकवस्तीचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जांभवडे गावातील भंडारवाडी, कुंभारवाडी, गावानमाळा तसेच खालचे जांभवडेमधील जवळपास ५० शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून या साकवावरून जावे लागत आहे. या नागरिकांना असणारा पर्यायी मार्ग नरडवे प्रकल्पाअंतर्गत जांभवडे-गावठाण बाजूने आहे. परंतु, हा मार्ग पूर्णपणे गडनदीतून जातो.
मोठा पाऊस झाला की हा सुद्धा मार्ग बंद होतो. त्यामुळे नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला तर त्यास जबाबदार कोण? असा हा प्रश्न मात्र अनुउत्तरीत आहे. जांभवडे जि. प. शाळेनजीक साकव आवश्यक आहे. त्याचबरोबर जांभवडे मुख्य रस्ता ते पुनर्वसनकडे जाणाऱ्या गडनदी पात्रातील रस्त्याची उंची वाढवणे, संरक्षण भिंत होणे आवश्यक आहे. अन्यथा दुर्घटना घडू शकते. याबाबत जांभवडे सरपंच अमित मडव यांनी सांगितले की, याबाबत लेखी पाठपुरावा संबंधित विभागाकडे करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे याविषयी कायमस्वरूपी उपाययोजनेचा तोडगा येत्या आठ दिवसात काढावा, त्याचप्रमाणे याबाबत आमदार निलेश राणे यांच्या हे निदर्शनास आणून यांची ग्रामस्थांनासहित भेट घेत तोडगा काढण्याचा प्रयन्तही सरपंच अमित मडव यांच्यामार्फत चालू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.










