LIVE UPDATES

Open Phugadi Competition : खुल्या फुगडी स्पर्धेत आमोणा येथील ब्रह्मेश्वर फुगडी मंडळ प्रथम

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 27, 2026 12:04 PM
views 48  views
#kokansadlive#news update#konkan update#

दोडामार्ग :  नुकत्याच पार पडलेल्या दोडामार्ग मधील नवरात्र उत्सव अंतर्गत खुल्या फुगडी स्पर्धेत गोव्यातील आमोणा येथील श्री ब्रह्मेश्वर फुगडी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक गोव्यातीलच अनुक्रमे श्री शांतादुर्गा फुगडी ग्रुप सर्वण व पिर्णा येथील श्री हनुमान पूरमेश्वर सांस्कृतिक मंडळाने पटकावला.  उत्कृष्ट फुगडी संघ म्हणून इब्रामपूर येथील सातेरी फुगडी मंडळाची निवड झाली. 

 येथील सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडळांने यंदाच्या नवरात्र उत्सवात या फुगडी स्पर्धेचे आयोजन केले होते . यामध्ये  वरील तिन्ही संघांसोबत गोव्यातील यशकीर्ती सांस्कृतिक फुगडी मंडळ - मुळगाव , श्री बाबा कोळेश्वर मंडळ - खरपाल , श्री रवळनाथ भजन मंडळ - न्हावेली, श्री सातेरी महिला मंडळ लाडफे यांनी तर सिंधुदुर्ग मधील राष्ट्रोळी फुगडी मंडळ  - मणेरी ( ता . दोडामार्ग) व श्री .कोळगेश्वर फुगडी ग्रुप - वझरे  ( ता . दोडामार्ग) या दोन संघांनी सहभाग घेतला होता.

दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक  संतोष नानचे यानी  पुरस्कृत केलेल्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक रोख १०,०००रु. द्वितीय क्रमांक  ७००० रु . तृतीय क्रमांक ३००० हजार रु. व उत्कृष्ट फुगडी संघासाठी १०००रु. अशी पारितोषिके ठेवण्यात आली होती . तर दोडामार्ग शहरातील श्री साई केबल इंटरनेट सर्विस चे मालक विशाल मणेरीकर यांनी विजेत्या संघासाठी आकर्षक ट्रॉफी पुरस्कृत केल्या होत्या .

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून साखळी गोवा येथील सुप्रिया सावंत  रोहिदास गावकर यांनी काम पाहिले . शिवाजी राजे हायस्कूल साळ गोवा मधील नितीन नाईक यांचे विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी मंडळाला लाभले . पारितोषिक वितरण प्रसंगी मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला वर्ग उपस्थित होता . स्पर्धेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष आनंद कामत यांनी केले.