
दोडामार्ग : राज्यात हिंदूंचा सर्वात मोठा सण असलेल्या गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यात घरगुती वीज ग्राहकांची वीज जोडणी तोडण्याची कारवाई सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गणपती सणाच्या तोंडावर सुरू असलेली ही कारवाई तात्काळ थांबवावी, अशी मागणी माजी जिल्हाप्रमुख बाबुराव दत्ताराम धुरी यांनी महावितरणकडे केली आहे.
याबाबत धुरी यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कुडाळ मंडळ कार्यालयातील अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले आहे. “गणपती सणाच्या दिवसांत घरगुती वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस देणे बंद करा; अन्यथा कार्यालयामध्ये बसू देणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी घराघरात सुरू असताना वीज जोडणी तोडल्यास नागरिकांची मोठी गैरसोय होऊ शकते. त्यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या अडचणी लक्षात घेऊन वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई थांबवावी, अशी मागणी धुरी यांनी केली आहे. “गणपती बाप्पाचे आगमन होत असताना घरात अंधार करण्याचा हा प्रकार कशासाठी?” असा सवाल उपस्थित करत महावितरणने ग्राहकांच्या भावना लक्षात घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.










