LIVE UPDATES

Sindhudurg news : गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासनाने अलर्ट मोडवर रहा

पालकमंत्री नितेश राणेंच्या सूचना : आनंदात व सुरक्षितपणे जिल्हावासीयांनी गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 09, 2026 19:56 PM
views 20  views

सिंधुदुर्गनगरी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये, वाहतूक सुरळीत राहावी तसेच नागरिकांना सुरक्षित, शांततापूर्ण आणि आनंददायी वातावरणात उत्सव साजरा करता यावा, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी येणाऱ्या २५ सप्टेंबर पर्यंत अलर्ट मोडवर राहून परस्पर समन्वयाने काम करावे, अशा सूचना राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक भंडारी सभागृहात आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या तयारीचा पालकमंत्री नितेश राणे यांनी आढावा घेतला. मागील महिन्यात झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांच्या पूर्ततेचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी गणेशोत्सव कालावधीतील विविध व्यवस्थांबाबत संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, शिक्षण सभापती, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या संख्येने चाकरमानी व जिल्हावासीय परतत असतात. त्यामुळे या कालावधीत रस्ते, वाहतूक, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, वीज, कायदा व सुव्यवस्था, दळणवळण तसेच आपत्कालीन सेवा या सर्व बाबी सक्षम ठेवण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राणे यांनी प्रत्येक विभागाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला.

वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष

गणेशोत्सव काळात जिल्ह्यात वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेऊन वाहतूक नियोजन प्रभावीपणे करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. प्रमुख मार्गांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पोलिसांचे अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावे. संवेदनशील ठिकाणी वाहतूक नियंत्रणाची प्रभावी व्यवस्था करावी. गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनांसह बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना कोणतीही अडचण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

आरोग्य व आपत्कालीन सेवा सज्ज ठेवण्याचे निर्देश

गणेशोत्सव कालावधीत आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत राहावी. ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये आवश्यक मनुष्यबळ, औषधसाठा व वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवाव्यात. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देता यावा यासाठी संबंधित यंत्रणांनी पूर्वनियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

पाणीपुरवठा, रस्ते व मूलभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करा

गणेशोत्सव काळात नागरिकांना पाणीपुरवठ्याची कोणतीही अडचण भासू नये, यासाठी स्थानिक पातळीवर योग्य नियोजन करावे. आवश्यक ठिकाणी पर्यायी व्यवस्था उपलब्ध ठेवावी. गणेशोत्सवापूर्वी उर्वरीत रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजविणे आणि आवश्यक त्या ठिकाणी प्रकाश व्यवस्था यासह मूलभूत सुविधांची कामे दोन दिवसात पूर्ण करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज

गणेशोत्सव हा जिल्ह्यातील सर्व समाजघटकांना एकत्र आणणारा उत्सव आहे. त्यामुळे उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. गर्दीची ठिकाणे, मिरवणूक मार्ग, विसर्जन स्थळे आणि संवेदनशील भागांमध्ये पुरेसे पोलीस मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

विभागांमध्ये समन्वय ठेवा

गणेशोत्सवाच्या काळात एखाद्या विभागाशी संबंधित समस्या निर्माण झाल्यास त्याचा परिणाम इतर सेवांवरही होऊ शकतो. त्यामुळे सर्व विभागांनी स्वतंत्रपणे काम न करता परस्पर समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. कोणतीही समस्या निर्माण होण्याची वाट न पाहता संभाव्य अडचणींचा आधीच अंदाज घेऊन त्यावर उपाययोजना कराव्यात. गणेशोत्सव संपेपर्यंत सर्व संबंधित विभागांनी अलर्ट मोडवर राहावे, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

जिल्हावासीयांनी आनंदात, सुरक्षितपणे उत्सव साजरा करावा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशोत्सवाची परंपरा आणि उत्साह मोठा आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने जिल्हावासीय आपल्या गावी येतात. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपल्या कुटुंबीयांसह आनंदाने आणि सुरक्षितपणे गणेशोत्सव साजरा करता यावा, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेचे पालन करावे आणि उत्सवाचा आनंद घेताना सामाजिक सलोखा व पर्यावरणाची काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

येत्या 25 सप्टेंबरपर्यंतच्या गणेशोत्सव कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांना कोणताही व्यत्यय येऊ नये, यासाठी प्रशासनाच्या सर्व यंत्रणा समन्वयाने कार्यरत राहणार असून, गणेशोत्सव शांततामय, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.