LIVE UPDATES

संजय राऊतांच्या कौतुकामागे दडलंय काय..?

पहिल्यांदाच नितेश राणेंचं जाहीर कौतुक
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 06, 2026 17:59 PM
views 534  views

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेकांवर सातत्याने टीका करणारे खासदार संजय राऊत आणि मंत्री नितेश राणे हे दोन नेते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी कारण वेगळे आहे. नेहमीप्रमाणे शाब्दिक चकमक न घडता, खासदार संजय राऊत यांनी पहिल्यांदाच मंत्री  नितेश राणे यांच्या कामाचे जाहीरपणे कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

विधान परिषद निवडणुकीतील कथित घोडेबाजारावरून राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी राऊत यांना प्रतीकात्मक स्वरूपात ‘बरनॉल’ पाठवत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. या राजकीय टोलेबाजीला उत्तर देताना राऊत यांनी अपेक्षेप्रमाणे प्रतिहल्ला न करता वेगळाच सूर लावला.

“मी काही रिटर्न गिफ्ट पाठवणार नाही. त्यांनी पाठवलेले गिफ्ट स्वीकारेन. गरजूंना ते देईन,” असे सांगत राऊत यांनी हलक्याफुलक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली.

मात्र, यानंतर त्यांनी केलेले वक्तव्य अधिक चर्चेचा विषय ठरले. “राज्यात जे मंत्री चांगले काम करतात, त्यापैकी नितेश राणे हे एक आहेत. मत्स्यव्यवसाय विभागासारखे महत्त्वाचे खाते ते प्रभावीपणे सांभाळत आहेत. त्यांनी काही चांगल्या योजना आणल्या आहेत,” असे सांगत राऊत यांनी राणेंच्या कामाचे खुलेपणाने कौतुक केले. हे कौतुक केवळ राजकीय सभ्यता आहे की त्यामागे काही व्यापक संदेश दडलेला आहे, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.