LIVE UPDATES

हिंदू कॉलनीतील जमीन प्रकरणाला नवे वळण

नगरसेविकेच्या आरोपांना जमीन मालक महादेव आरेकर व त्यांच्या पत्नीचे चोख उत्तर
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 12, 2026 10:22 AM
views 4191  views

 

कुडाळ:

कुडाळ नगरपंचायत हद्दीतील हिंदू कॉलनीतील जमिनीवरून सुरू असलेल्या वादाला आता एक नवे वळण मिळाले आहे. एकीकडे नगरसेविका सौ. संध्या तेरसे यांनी नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे जागा हातातून गेल्याचा आरोप करत मुख्याधिकाऱ्यांविरोधात उपोषण केले असतानाच, दुसरीकडे या जागेचे मूळ मालक व कुळ असणारे महादेव तुकाराम आरेकर आणि त्यांच्या पत्नीने आपली बाजू मांडत नगरसेविकांचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. तसेच या संपूर्ण प्रकरणामागील नगरसेविकेच्या हेतूंवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

महादेव तुकाराम आरेकर यांच्या पत्नी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदू कॉलनीतील ३७ गुंठे जमिनीवर त्यांनी 'कुळ' म्हणून रीतसर दावा केला होता. हा दावा माननीय महसूल आयुक्त यांनी मान्य करून २००८ मध्ये ३७ गुंठ्याचा फेरफार आरेकर यांच्या नावे केला. या प्रकरणाबाबत माननीय तहसीलदार, प्रांताधिकारी, महसूल न्यायाधिकरण मुंबई ते थेट उच्च न्यायालय (हायकोर्ट) स्तरावर तब्बल १६ दावे खेळले गेले आणि सर्व निकाल आरेकर यांच्या बाजूने लागले.

या कायदेशीर विजयाचा हवाला देत जमीन मालकांच्या पत्नीने थेट सवाल केला आहे की, "जर आम्ही ही जागा न्यायालयाकडून पूर्णपणे कायदेशीर व योग्य मार्गाने जिंकली आहे, तर मग एवढ्या वर्षांनंतर अचानक संध्या तेरसे कशा काय जाग्या झाल्या? मुळात एवढी वर्षे गप्प राहून आताच हे आंदोलन करण्यामागे त्यांचा नक्की हेतू काय?" असा रोखठोक प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.आपली व्यथा मांडताना जमीन मालकांच्या पत्नी भावूक होत म्हणाल्या, "आम्ही आता वयोवृद्ध झालो आहोत, आमचे वय ७० च्या पार गेले आहे. या वयामध्ये आम्ही कोर्टाचे दावे कसे चालवायचे? त्यासाठी लागणारा खर्च कसा करायचा? हा आमच्यासमोर मोठा यक्षप्रश्न आहे. कायदेशीर निकाल आमच्या बाजूने असतानाही केवळ राजकीय हेतूने आम्हाला नाहक त्रास दिला जात आहे." या पार्श्वभूमीवर, कुडाळमधील सुजाण नागरिकांनी आणि कुडाळवासीयांनी स्वतः या संपूर्ण प्रकारावर आणि आमच्यावर होणाऱ्या अन्यायावर लक्ष ठेवावे, अशी मार्मिक विनंती त्यांनी सर्व जनतेला केली आहे.आरेकर यांनी निवेदनात एक महत्त्वाचा खुलासा केला आहे की, जेव्हा हे प्रकरण न्यायालयात होते, तेव्हा माननीय आयुक्तांनी या जागेवर नगरपंचायतीने उभारलेली पाण्याची टाकी पाडण्यासंदर्भात न्यायालयात जाण्याचे लेखी आदेश आरेकर यांना दिले होते. मात्र, आरेकर यांनी सामंजस्याची भूमिका घेत कोर्टात धाव घेतली नाही. या ठिकाणी एकूण १ एकर ४ गुंठे जमीन असून, अजूनही ३७ गुंठे जमीन वगळता उर्वरित जागा मूळ मालकांच्याच नावे आहे.

शासकीय निधीच्या खर्चावर उपस्थित केले प्रश्न

नगरसेविका संध्या तेरसे यांच्या भूमिकेवर सवाल उठवताना आरेकर म्हणाले की, जर ही जागा अजूनही मूळ मालकांच्या नावे आहे आणि ती 'रस्ते खुला क्षेत्र' म्हणून सोडण्यात आली आहे, तर गेल्या व चालू दहा वर्षांत नगरसेविका म्हणून त्यांनी या रस्त्यावर शासकीय निधी कसा काय खर्च केला? तसेच याच खुल्या क्षेत्रामध्ये 'ओपन जिम' व 'गार्डन' विकसित करण्यात आले आहे, ते कोणत्या नियमाखाली? ही जागा नगरपंचायतीच्या नावे करण्यासाठी नगरसेविकेने पूर्वी का प्रयत्न केले नाहीत? असा सवाल त्यांनी केला आहे.या वादावर पडदा टाकण्यासाठी जमीन मालक महादेव आरेकर यांनी एक अत्यंत सकारात्मक प्रस्ताव ठेवला आहे. आरेकर हे आपल्या ताब्यातील ३७ गुंठ्यांपैकी २३ गुंठे जमीन विक्री करत आहेत. मात्र, उर्वरित जागेपैकी ज्या ३ गुंठे जमिनीवर नगरपंचायतीची दीड कोटी रुपयांची पाण्याची टाकी उभी आहे, ती ३ गुंठे जमीन कुडाळवासीयांच्या पाणीपुरवठ्याचा विचार करून नगरपंचायतीला कोणताही मोबदला न घेता (विनामोबदला) हस्तांतरित करण्यास ते तयार आहेत. केवळ नगरपंचायतीने या जमिनीची मोजणी करून तुकडा पाडण्यासाठी  सहकार्य करावे, जेणेकरून पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल, असे आरेकर यांनी शेवटी म्हटले आहे.त्यामुळे आता न्यायालयीन निकाल, वयोवृद्ध जमीन मालकांची भावनिक साद आणि त्यांनी दिलेल्या विनामोबदला जागेच्या प्रस्तावानंतर कुडाळ नगरपंचायत प्रशासन आणि आंदोलक नगरसेविका काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण कुडाळवासीयांचे लक्ष लागले आहे.