LIVE UPDATES

कोलगावातील भोंदूगिरीविरुद्ध वर्षभरापूर्वीच पोलिस तक्रार

अघोरी प्रथा व काळ्या जादूविरोधात ‘अंनिस’कडे घेतलेली धाव
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 12, 2026 16:00 PM
views 571  views

सावंतवाडी : दैवी शक्ती व काळ्या जादूचा खोटा आव आणून सर्वसामान्य आणि साध्याभोळ्या लोकांची आर्थिक फसवणूक करत असल्याचा आरोप करत कोलगाव येथील भोंदू बाबा फिरोज विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) सिंधुदुर्ग शाखेकडे लेखी तक्रार केली होती. तसेच वर्षभरापूर्वी सावंतवाडी पोलिसांकडेही १२२ जणांच्या सहीने तक्रार अर्ज केला होता. 

 ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २०१३’ अंतर्गत या भोंदू बाबावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. कोलगाव फणसवाडी येथे गेल्या ८ ते १० वर्षांपूर्वी एक दर्गा अस्तित्वात आला. हा दर्गा आपल्या स्वप्नात येत असल्याचा दावा करत फिरोज आदम शेख या व्यक्तीने गावात अफवा पसरवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तावीज आणि दोरे देणाऱ्या या व्यक्तीने गावातील भोळ्या भाविकांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीच्या काळात ग्रामस्थांनी स्वतः वर्गणी काढून या दर्ग्याचे उरूसही साजरे केले. तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार, गेल्या २ ते ३ वर्षांत या बाबाचे स्वरूप पूर्णपणे बदलले. स्वतःला काळी जादू अवगत असल्याचे भासवून त्याने घरातच अघोरी प्रकार सुरू केले. लोकांवर जादूटोणा करणे, बाहुल्यांवर अघोरी क्रिया करून त्या स्थानिक स्मशानभूमीत दफन करणे, काजळ, कुंकू, बांगड्या आणि हाडांचा वापर करून अघोरी उतारे करणे असे प्रकार सुरू असल्याच आरोप करत हा भोंदू बाबा आठवड्यातून प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी दोन बकऱ्यांचा बळी देतो. तसेच वेगवेगळी वारी अंगात आणल्याचा खोटा आव आणून लोकांच्या भावनांशी खेळत आहे अशी तक्रार केली होती.

पूर्वी अवघे १० ते १२ हजार रुपये कमवणारा हा आता लोकांची फसवणूक करून प्रचंड श्रीमंत झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. बाबाच्या दारात दररोज सकाळी ७ वाजल्यापासून ग्राहकांच्या रांगा लागतात, ज्यामध्ये गोवा राज्यातून येणाऱ्या आलिशान गाड्यांचा मोठा समावेश असतो. एका सामान्य ग्राहकाकडून उतारा करण्यासाठी कमीत कमी ४ ते ५ हजार रुपये, तर श्रीमंत ग्राहकांकडून २० ते २५ हजार रुपयांपर्यंत रक्कम उकळली जाते.

केवळ एक लिंबू फिरवून उतारा करण्यासाठी ४०० रुपये घेतले जातात, तर अमावस्येच्या दिवशी येथे जत्रेसारखे वातावरण असते. भोंदू बाबाचे घर वाडीला लागूनच असल्याने या अघोरी कृत्यांचा लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत आहे. जेव्हा गावातील लोकांनी एकत्र येऊन या प्रकाराबाबत विचारणा केली, तेव्हा बाबाने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच, माझ्या वाटेला गेलात तर काळ्या जादूने करणी करून संपवून टाकेन, अशी थेट धमकी ग्रामस्थांना दिली. याशिवाय, सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा राज्यातील मोठ्या राजकीय पदाधिकाऱ्यांशी आपले लागेबांधे असून त्यांचा आपल्या पाठीशी हात असल्याचे सांगून तो गावकऱ्यांना घाबरवत आहे.

कायदेशीर कारवाईची मागणी

या जाचाला कंटाळून अखेर कोलगाव येथील सियास अहमद शेख, नाज शफी अहमद शेख, इरफान इब्राहीम शेख, तसेच महिला व पुरुषांसह तब्बल १२० पेक्षा जास्त ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्या करून अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे, पोलिस ठाण्यात दाद मागितली होती.

आज माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह त्यांच्या मुलावर पत्नीकडून झालेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही बाबा समोर आली आहे. त्याला ठाणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याचे अनेक अघोरी प्रकार देखील समोर आले आहेत. याबाबत सावंतवाडी पोलिसांना विचारलं असता, उरूसच्या आधी परवानगी देऊ नये या अनुषंगाने असा अर्ज दाखल केला होता. दोन्ही बाजूच्या घेतलेल्या मिटींगमध्ये त्यावर तोडगा निघून उरूस प्रथेप्रमाणे साजरा करण्याचे ठरले. यावेळी संबंधिताच्या घरी जाऊन पोलिसांनी चौकशी केली होते. मात्र, काही मिळाले नव्हते. त्यानंतर त्याने मशिदीला पायऱ्याकरिता जागा देण्याचे मान्य केल्याने दोघांना समज देऊन वाद निकाली निघाला व दोन्ही पार्टींनी उरूस साजरा केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.