
कुडाळ | प्रतिनिधी
राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन, कुडाळ सायकल क्लब, रांगणा रनर्स, रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या 'कुडाळ मॉन्सून रन २०२६' या मॅरेथॉन स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यंदा स्पर्धेचे तिसरे वर्ष असून, तब्बल दोन हजारांहून अधिक धावपटूंनी विविध गटांत सहभाग नोंदवत ही स्पर्धा यशस्वी केली.
आंतरराष्ट्रीय धावपटूंच्या उपस्थितीने वाढला उत्साह
या मॅरेथॉनचे मुख्य आकर्षण ठरले ते स्पर्धेचे ब्रँड ॲम्बेसेडर, केनिया देशातील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन विजेते व ऑलिम्पिक चॅम्पियन विल्सन किप्रॉप. त्यांच्यासोबत सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि माजी आमदार वैभव नाईक यांनीही प्रत्यक्ष धावत सहभाग घेतला आणि उपस्थितांचा तसेच स्पर्धकांचा उत्साह द्विगुणीत केला.
निसर्गरम्य मार्गावर रंगली स्पर्धा
बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, एमआयडीसी, कुडाळ येथून या मॅरेथॉनचा दिमाखात प्रारंभ झाला. धावपटूंनी नेरूर मार्गे जात वालावल येथील ऐतिहासिक श्री लक्ष्मीनारायण मंदिर परिसरातील नदीकाठ गाठला. तेथून परतीचा प्रवास करत पुन्हा बॅ. नाथ पै शिक्षण संस्था येथे स्पर्धेचा यशस्वी समारोप झाला. पावसामुळे निसर्गरम्य झालेल्या या मार्गावर धावण्याचा आनंद सर्वच धावपटूंनी घेतला.
या स्पर्धेत धावपटूंसाठी खालीलप्रमाणे विविध गट ठेवण्यात आले होते:
५ कि.मी. फन रन
१० कि.मी. रन
१६ कि.मी. जे.आर. फन रन
२१ कि.मी. (हाफ मॅरेथॉन)
मान्यवरांची मांदियाळी
या प्रसंगी शिवसेना (उबाठा) माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, राणे हॉस्पिटलचे डॉ. जी. टी. राणे, अजित राणे, सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष गजानन कांदळगावकर, डॉ. प्रशांत सामंत, डॉ. जयसिंग रावराणे, रूपेश तेली, शिवप्रसाद राणे, उमेश गाळवणकर यांच्यासह विविध शासकीय अधिकारी, पदाधिकारी, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर आणि 'टीम कुडाळ मॉन्सून रन'चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य आणि क्रीडा संस्कृतीला चालना देणाऱ्या या भव्य आणि शिस्तबद्ध आयोजनाबद्दल सहभागी धावपटूंनी आणि उपस्थितांनी आयोजक संस्थांचे विशेष कौतुक केले.










