LIVE UPDATES

कुडाळ जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले

२९ जुलैपासून कर्मचाऱ्यांचा 'काम बंद'चा इशारा; आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची भीती
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 12, 2026 16:14 PM
views 50  views

कुडाळ : प्रतिनिधी

कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या ५२ कुशल-अकुशल कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतनाची प्रतीक्षा आहे. प्रशासकीय उदासीनता आणि कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे हे कर्मचारी प्रचंड आर्थिक कोंडीत सापडले आहेत. वारंवार मागणी करूनही पगार न मिळाल्याने अखेर हतबल झालेल्या कर्मचाऱ्यांनी सोमवार, दिनांक २० जुलैपासून सामूहिक 'काम बंद' आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णालयात सन २०२२ पासून हे सर्व कर्मचारी २४ तास अविरत आरोग्य सेवा पुरवत आहेत. ३१ मार्च २०२६ रोजी त्यांच्या कंत्राटाची अधिकृत मुदत संपली. त्यानंतर १ एप्रिलपासून कोणतीही लेखी ऑर्डर नसताना, केवळ रुग्णांची आबाळ होऊ नये या माणुसकीच्या भावनेने हे कर्मचारी काम करत आहेत. मात्र,  त्यांच्या या प्रामाणिकपणाची आणि कर्तव्याची किंमत शून्य केल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

आपली व्यथा मांडताना कर्मचाऱ्यांनी कंत्राटदारांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला. कंत्राटानुसार ठरलेली रक्कम आणि प्रत्यक्षात बँक खात्यात येणारी रक्कम यात मोठी तफावत आहे. तसेच भविष्य निर्वाह निधी (PF) किंवा ईएसआयसी (ESIC) यांसारखा कोणताही कायदेशीर लाभ दिला जात नाही.

सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे, महिला व बालकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांना हक्काची 'मातृत्व रजा' आणि त्या काळातील पगार देण्यासही कंत्राटदारांनी स्पष्ट नकार दिला आहे. रुग्णालयाला मनुष्यबळ पुरवणाऱ्या चार एजन्सीच्या प्रतिनिधींना जेव्हा कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासाठी फोन केले, तेव्हा पैसे देण्याऐवजी कंत्राटदारांनी कर्मचाऱ्यांचे फोन नंबरच 'ब्लॉक' केले आहेत. कंत्राटदारांच्या या असंवेदनशील आणि मुजोर वर्तनामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र रोष आहे. पगार मिळत नसल्याने यापूर्वीच काही कर्मचाऱ्यांनी नोकरीला रामराम ठोकला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय वाळके यांनी प्रशासनाची बाजू मांडली. कर्मचाऱ्यांच्या कंत्राटाची मुदत संपण्यापूर्वीच, जानेवारी २०२६ मध्ये जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत कोल्हापूर उपसंचालक कार्यालयाकडे मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता, अशी माहिती त्यांनी दिली.

नुकत्याच झालेल्या वरिष्ठ पातळीवरील बैठकीत सध्याच्या एजन्सीला ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचे सकारात्मक संकेत मिळाले आहेत. तसेच सोमवार सायंकाळपर्यंत पालकमंत्री आणि अतिरिक्त आयुक्तांच्या पातळीवर चर्चा होऊन यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन डॉ. वाळके यांनी दिले. लेखी आदेश येताच सर्व थकीत वेतन एकत्रितपणे दिले जाईल, अशी ग्वाही देत प्रशासनाने कर्मचाऱ्यांना काम सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे.

प्रशासकीय लाल फितशाही आणि फाईलच्या रेंगाळलेल्या प्रवासात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मात्र कोंडमारा होत आहे. सोमवार दि. २० जुलैपर्यंत जर लेखी आदेश आणि थकीत पगाराची ठोस हमी मिळाली नाही, तर हे ५२ कर्मचारी सामूहिक रित्या काम बंद करणार आहेत. असे झाल्यास कुडाळ माता व बाल रुग्णालयातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची दाट भीती व्यक्त होत असून, याला सर्वस्वी रुग्णालय प्रशासन आणि मुजोर कंत्राटदार जबाबदार असतील, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.