LIVE UPDATES

पाणी पुरवठा योजनांचे आर्थिक लेखापरीक्षण करा

• ज्येष्ठ नागरिक पुरूषोत्तम केनवडेकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 17, 2026 16:00 PM
views 34  views

सावंतवाडी :  नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत "पाणीपुरवठा योजनेची वाट लावली" असे विधान करण्यात आले. या विधानाच्या अनुषंगाने वस्तुस्थिती जनतेसमोर येणे आवश्यक असल्याने शहरातील पाणी पुरवठा योजनांच्या सद्यस्थितीची प्रत्यक्ष पाहणी, निष्पक्ष चौकशी व आर्थिक लेखापरीक्षण करावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक पुरूषोत्तम केनवडेकर यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे. तसेच नगराध्यक्षांनाही निवेदन दिले आहे. 

या शहराला अधिक प्रमाणात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने पाळणेकोंड धरणाची उंची वाढविण्यात आली. त्यावेळी गोड-बोले गेटच्या पायाभरणीचा तसेच धरण पाण्याने भरल्यानंतर खणा-नारळाने ओटी भरण्याचा कार्यक्रम तत्कालीन नगराध्यक्ष यांच्या हस्ते पार पडला होता. याच कालावधीत पाळणेकोंड  धरणावरील जलशुद्धीकरण केंद्र, केसरी यथील बंधारा उंचावणे व त्यावरील इमारत, नरेंद्र डोंगर झरा पाणी योजना, जलशुद्धीकरण केंद्र, लाखेवस्ती, हेल्थ पार्क रघुनाथ मार्केट, नरेंद्र डोंगर येथील पाणी साठवण टाक्या आदी अनेक विकासकामांचे भमिपूजन लोकार्पण करण्यात आले.

परंतु, या सर्व प्रकल्पांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही शहरवासियांना अपेक्षित अतिरिक्त पाणी उपलब्ध झालेले नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. अनेक पाणी साठण टाक्यांमध्ये आजपर्यंत पाणी साठविले गेल नसल्याची परिस्थिती आहे. शहराच्या मध्यवर्ती उभा बाजार परिसरासाठी नरेंद्र डोंगर येथे उभारण्यात आलेली पाणी साठवण टाकी व पाईपलाईन कार्यान्वित करताना बसविण्यात आलेला स्वयंचलित एअर व्हॉल्व्ह प्रत्यक्षात दररोज कर्मचाऱ्यांकडून  हाताने चालवावा लागत असल्याचे समोर येते. अन्यथा, संबंधित भागात पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे या योजनेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न निर्माण होतात.

तसेच केसरी बंधाऱ्यावर उभारलेल्या इमारतीचा आज अपेक्षित वापर होत नसल्याचे दिसून येते. त्या इमारतीवर झालेला खर्च, त्याचा उद्देश व सद्यस्थिती याचीही सखोल तपासणी होणे आवश्यक आहे. संबंधित प्रकल्पांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टींग योजना राबविल्याचा दावा करण्यात आला होता. त्या योजनांची प्रत्यक्ष कार्यस्थितीही तपासली जाणे गरजेचे आहे.

याशिवाय, शहरातील पाणीपुरवठा दुरुस्तीसाठी लागणाऱ्या साहित्यावरील खर्च पूर्वी काही हजार रुपयांच्या मर्यादेत होता. मात्र, मागील काही वर्षांत हा खर्च लाखो रुपयांपर्यंत वाढलेला दिसून येतो. तसंच पाणीपुरवठा साहित्य खरेदी व रंग खरेदीवरील मागील अनेक वर्षांचा वर्ष तपासल्यास झालेली वाढ व त्यामागील कारणांची पडताळणी होणे आवश्यक आहे. 

वरील सर्व प्रकल्पांच्या भूमिपूजन व लोकार्पणावेळी शहरवासीयांना २४ तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु संबंधित प्रकल्पांचे योग्य नियोजन, प्रभावी अंमलबजावणी आणि नियमित देखभाल झाली असती, तर आज ५६ कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्याची आवश्यकता निर्माण झाली नसती, अशी जनमानसात भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे आपण नगराध्यक्षा म्हणून सर्व नगरसेवक, संबंधित अधिकारी व तांत्रिक तज्ज्ञ यांच्या उपस्थितीत खालील बाबींवर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी श्री. केनवडेकर यांनी केली आहे.

यात सर्व पाणीपुरवठा प्रकल्पांची प्रत्यक्ष संयुक्त पाहणी करण्यात यावी, प्रत्येक प्रकल्पाची कार्यस्थिती, उपयुक्तता व सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात यावा, सर्व संबंधित कामांचे स्वतंत्र तांत्रिक परीक्षण व गुणवत्ता तपासणी करण्यात यावी, प्रकल्पांवरील खर्चाचे स्वतंत्र आर्थिक लेखापरीक्षण करण्यात यावे, पाणीपुरवठा साहित्य व रंग खरेदीवरील मागील अनेक वर्षांच्या खर्चाची चौकशी करण्यात यावी, दोषी अधिकारी, कंत्राटदार अथवा संबंधित व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार योग्य कारवाई करण्यात यावी, चौकशीचा संपूर्ण अहवाल नागरिकांसाठी सार्वजनिक करण्यात यावा. सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी आणि शहराच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक निर्णय व्हावेत, हीच या निवेदनामागील भूमिका आहे अशी अपेक्षा आहे असं त्यांनी म्हटलं आहे.