
सावंतवाडी : नगरपरिषद क्षेत्रात यापुढे विनापरवानगी बॅनर लावले जाणार नाहीत, याची प्रशासनाने कडक पद्धतीने काळजी घ्यावी. बॅनर परवानगी घेऊन ठरवून दिलेल्या जागीच लावले जातात की नाही याची पाहणी करावी, असे स्पष्ट निर्देश नगराध्यक्षा श्रद्धाराजे सावंत-भोसले यांनी दिले. त्यानंतर शहरातील बॅनर हटविण्यास प्रशासनाकडून प्रारंभ झाला.
नगरपरिषदेची सभा नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्थित होते. सभेत नगरसेवक तौकीर शेख यांनी शहरातील अनधिकृत बॅनरबाजीचा प्रश्न उपस्थित केला. स्वतः परवानगी घेऊनही आपल्याला आलेला वाईट अनुभव त्यांनी मांडला. यावर मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी संबंधित अधिकाऱ्याला बोलावून वस्तुस्थितीची खात्री करून घेतली. तर उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी काही बॅनर देशप्रेमाचे असल्याचे यावेळी म्हटले. सभेनंतर प्रशासनाकडून परवानगी नसलेल्या बॅनरवर कारवाई करण्यात आली.











