
देवगड : बदलत्या परिस्थितीत जमिनीतील ओलावा टिकवून ठेवून शेती उत्पादनाला चालना देण्याच्या उद्देशाने शासनाकडून सन २०१६-१७ पासून अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना’ राबविण्यात येत आहे. देवगड तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके व गटविकास अधिकारी निलेश जगताप यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना विविध कृषी घटकांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. नवीन विहिरीसाठी ४ लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्तीसाठी १ लाख रुपये, इनवेल बोअरिंगसाठी ४० हजार रुपये, पंपसंचासाठी ४० हजार रुपये, वीज जोडणीसाठी २० हजार रुपये, तुषार व ठिबक सिंचनासाठी ९७ हजार रुपये, एचडीपीई/पीव्हीसी पाईपसाठी ५० हजार रुपये, बैलचलित/ट्रॅक्टरचलित यंत्रसामग्रीसाठी ५० हजार रुपये तसेच परसबागेसाठी ५ हजार रुपये अशी अनुदानाची मर्यादा आहे.
लाभार्थ्यांसाठी पात्रतेच्या अटी
लाभार्थी हा अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध शेतकरी असणे आवश्यक असून, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावे किमान ०.४० हेक्टर ते कमाल ६ हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.सामूहिक शेतजमीन किमान ०.४० हेक्टर धारण करणारे एकत्रित कुटुंब नवीन विहीर या घटकासाठी पात्र राहणार आहे. दोन किंवा अधिक लाभार्थी एकत्र आल्यास त्यांची एकत्रित जमीन किमान ०.४० हेक्टर असल्यास, करार करून योजनेचा लाभ घेता येणार आहे. दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना कमाल ६ हेक्टर जमीनधारणेची अट लागू राहणार नाही. तसेच उत्पन्नाच्या दाखल्याची अटही सर्व अर्जदारांना लागू राहणार नाही. लाभार्थ्याच्या नावे जमिनीचा अद्ययावत ७/१२ उतारा व ८-अ उतारा, आधार कार्ड तसेच आधारशी संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्जासाठी फार्मर आयडी आवश्यक
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर जाऊन ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडून आधार क्रमांक प्रमाणित करावा. शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी असल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नसल्याने अर्जदारांकडे फार्मर आयडी असणे अत्यावश्यक आहे. ऑनलाईन अर्ज भरताना शेतकऱ्यांनी अद्ययावत ७/१२, ८-अ उतारा, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, बँक पासबुकची प्रत तसेच आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक जवळ ठेवावा.
ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर ग्रामसभेच्या शिफारसीसह आवश्यक कागदपत्रांची प्रत गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे सादर करावी लागणार आहे. अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे लाभार्थ्याने स्वयंसाक्षांकित करणे आवश्यक आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य परिपूर्ण प्रस्ताव सादर केलेल्या लाभार्थ्यांची निवड जिल्हा परिषद स्तरावरील जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत करण्यात येणार आहे. वैयक्तिक लाभार्थी निवडीत महिला व दिव्यांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार असून, ऑनलाईन अर्ज करणाऱ्या अर्जदारांमधून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या पद्धतीने लाभार्थी निवड केली जाणार आहे.
मंजूर अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.त्यामुळे देवगड तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके व गटविकास अधिकारी निलेश जगताप यांनी केले आहे.











