
चिपळूण : कोकणच्या विकासाचा महत्त्वपूर्ण दुवा ठरणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गांचे काम अंतिम टप्प्यात पोहोचत असताना, या महामार्गाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी आता संघटित स्वरूपात पुढे येत आहे.
या मागणीला व्यापक जनाधार मिळवून देण्यासाठी चिपळुणातील विविध सामाजिक व धार्मिक संघटनांचे पदाधिकारी आणि आंबेडकरी विचारांचे अनुयायी एकत्र आले आहेत. या एकजुटीतूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय महामार्ग नामाभिधान समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे.
शनिवारी दि.२१ नोव्हेंबर रोजी शहरातील डॉ. आंबेडकर स्मारक भवन येथे यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महामार्गाला बाबासाहेबांचे नाव देण्याची मागणी केवळ एका संघटनेपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण कोकणातील समविचारी संघटनांना या अभियानाशी जोडण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. शासनाच्या विविध स्तरांवर निवेदने, चर्चा आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करून ही मागणी मार्गी लावण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.
आंबडवेच्या भूमीचा ऐतिहासिक वारसा
रत्नागिरी जिल्ह्याला समाजप्रबोधन, समता आणि परिवर्तनाच्या चळवळींचा समृद्ध वारसा लाभला आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे याच जिल्ह्यात आहे. त्यामुळे कोकणच्या भूमीशी बाबासाहेबांचे असलेले ऐतिहासिक नाते अधोरेखित करणारा मुंबई-गोवा महामार्ग त्यांच्या नावाने ओळखला जावा, अशी भूमिका समाजबांधवांनी मांडली. महामार्गाला बाबासाहेबांचे नाव मिळाल्यास त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राष्ट्रीय योगदानाचा गौरव होण्याबरोबरच नव्या पिढीला त्यांच्या विचारांची ओळख करून देण्यास मदत होईल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे या मागणीला के वळ नामकरणाचा विषय न मानता कोकणच्या ऐतिहासिक वारशाशी जोडलेली भूमिका म्हणून पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला.
संघटनात्मक ताकदीवर उभारणार व्यापक अभियान
बैठकीत झालेल्या चर्चेत चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीचे स्थानिक तालुका कमिटी अध्यक्ष चंद्रकांत सावंत, उपाध्यक्ष नाना सावंत, बौद्धजन उत्कर्ष समितीचे अध्यक्ष समाजभूषण शीलभद्र जाधव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काशीराम कदम, रमाकांत सकपाळ, राजूभाई जाधव, संदेश मोहिते, डॉ. अशोक सकपाळ, सुनिल गमरे, मिलिंद कदम, संजय गमरे, प्रभाकर सकपाळ, संजय कदम, प्रवीण जाधव, विलास जाधव, सचिन मोहिते आणि उमेश सकपाळ यांनी सहभाग घेतला. यावेळी अनंत पवार, रोहित कदम, जितेंद्र जाधव, अनंत मोहिते, अनिकेत कांबळे, सुनिल जाधव, अरुण मोहिते, प्रणय जाधव, आकाश कांबळे आणि स्वप्निल पवार उपस्थित होते.
आठजणांवर समितीची जबाबदारी
समन्वय समितीमध्ये संदेश मोहिते, शीलभद्र जाधव, राजूभाई जाधव, मिलिंद कदम, प्रवीण जाधव, सचिन मोहिते, उमेश सकपाळ आणि आकाश कांबळे यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीच्या माध्यमातून कोकणातील विविध सामाजिक संघटना, संस्था आणि समविचारी कार्यकर्त्यांशी संपर्क साधून मागणीचा विस्तार करण्यावर भर दिला जाणार आहे. पुढील आंदोलनात्मक व प्रशासकीय रणनीती निश्चित करण्यासाठी मंगळवारी दि. २४ नोव्हेंबर रोजी पुन्हा बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








