
कुडाळ : कुडाळ येथील शिवाजीनगर मधील रहिवासी असलेले नियाज शाह हे एका खासगी कामानिमित्त मुंबईत गेले असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात तपासणी केली असता, त्यांच्या किडनीला इन्फेक्शन झाल्याचे आणि फुफ्फुसात पाणी साचल्याचे समोर आले. प्रकृती अतिशय गंभीर बनल्याने शाह कुटुंबियांसमोर मोठे संकट उभे ठाकले.
या कठीण प्रसंगी कुडाळचे नगरसेवक अभिषेक गावडे यांनी तातडीने पुढाकार घेत ही गंभीर परिस्थिती आमदार निलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली. आमदार निलेश राणे यांनी कुठलाही वेळ न घालवता तातडीने सूत्रे हलवली आणि मुंबईतील लीलावती रुग्णालयात नियाज शाह यांच्या उपचाराची तात्काळ सोय केली.
आमदार निलेश राणे आणि नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या या समयसूचकतेमुळे व प्रयत्नांमुळे शाह यांच्यावर योग्य वेळी व योग्य उपचार सुरू होऊ शकले. या गंभीर आजारावरील उपचारासाठी जवळपास बारा लाख रुपयांचा खर्च आला असून, आगामी आठ दिवसांत त्यांची बायपास सर्जरी देखील होणार आहे. आपल्या संकटाच्या काळात धावून आलेल्या आणि उपचारासाठी मोलाची मदत करणाऱ्या नगरसेवक अभिषेक गावडे आणि आमदार निलेश राणे यांचे नियाज शाह व त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.











