
मालवण : जिल्ह्यातील सर्व प्रलंबित समस्यांवर मनसे आगामी काळात तीव्र आवाज उठवणार असून गणेशोत्सवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा होणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिरीष सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कचेरी रोड येथील मनसेच्या नवीन तालुका कार्यालयाचे उद्घाटन शिरीष सावंत यांच्या हस्ते पार पडले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, १५ ऑगस्टपासून नवी मुंबई ते चिपी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली होती, मात्र नेहमीप्रमाणे हा भ्रमनिरास ठरला. तसेच मोठ्या गाजावाजा करून सुरू केलेली भाऊचा धक्का ते विजयदुर्ग बोटसेवा काही महिन्यांतच बंद पडली, असा टोला त्यांनी लगावला.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम १५ ते २० टक्के अजूनही अपूर्ण आहे. या रखडलेल्या महामार्गाला सत्ताधारी राजकारणीच जबाबदार असून यंदाच्या गणेशोत्सवातही चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. ओसरगाव येथे सुरू होणाऱ्या टोलनाक्यामुळे शासकीय व दैनंदिन कामासाठी ओरोस येथे ये-जा करणाऱ्या जिल्हावासीयांवर नाहक आर्थिक भुर्दंड पडणार आहे. हा टोलनाका खारेपाटण हद्दीवर असायला हवा होता, अशी मागणी त्यांनी केली.
जिल्ह्यातील एलईडी मासेमारी, गवारडे येथील हत्तींचा उपद्रव, रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्या आणि 'जेन झी' युवा पिढीसाठी रोजगाराचा अभाव यांसारख्या गंभीर प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. यावेळी कचेरी रोड येथील मनसे तालुका कार्यालयाचे उद्घाटन सावंत यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, उप जिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन, शहराध्यक्ष सागर जाधव, उप तालुकाध्यक्ष गजानन बोडवे, विल्सन गिरकर, जेनिफर अन्ननसिएशन, सुरज पुजारे, संतोष सावंत, प्रसाद परब, प्रितेश सावंत, नारायण शिरोडकर, प्रसाद मेस्त्री, महेश गावडे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










