
दोडामार्ग : मांगेली तळेवाडी येथे अभ्यागत कराच्या नावाखाली ग्रामपंचायतीच्या नावावर टेंडर घेतलेल्या ठेकेदाराकडून वाटमारी सुरू आहे. येणारा प्रवासी किंवा स्थानिक माणूस फणसवाडी येथे असलेल्या धबधब्यावर जातो की, फणसवाडी येथे मित्र किंवा नातेवाईकांकडे जातो याची शहानिशा न करता किंवा त्यांचे ऐकून न घेता प्रत्येकी १० रुपये घेतले जात आहेत.
विशेष म्हणजे दुचाकी किंवा चारचाकीत कितीही माणसे असली, तरी १० रुपयांची एकच पावती देवून सर्वांचे पैसे वसूल केले जात आहेत. याचा अनुभव तालुक्यातल्या एका पत्रकाराला आला. त्याच्यासोबत त्यांची पत्नी, त्यांचा पत्रकार मित्र, त्याची पत्नी व छोटी दोन मुले फणसवाडीला जात होती. त्यांना वाटेत अडवून ठेकेदार संजय गवस यांनी ४० रुपयांची मागणी केली. पत्रकाराने ४० रुपये दिल्यावर पावतीपुस्तक बाळगणाऱ्या युवकाने पावतीवरील १० चा आकडा खोडून एकच पावती दिली. त्याबाबत विचारले असता ठेकेदाराने वाद घालायला सुरुवात केली. आम्ही स्थानिक असून पत्रकारांकडून कधी पैसे घेतले जात नाहीत, तरीही आम्ही पैसे दिले, असे असताना तुम्ही चार पावत्यांऐवजी एकच पावती कशी देता, ही फसवणूक आहे असे सांगितले असता, आम्हाला पत्रकार लागत नाहीत, पैसे द्या आणि जा, नाहीतर परत जा, असे उद्धट उत्तर दिले.
आम्ही कुणाला पैसे घेतल्याशिवाय सोडत नाही. आम्ही ८० हजार रुपये ग्रामपंचायतीकडे भरून टेंडर घेतले आहे, असे सांगून अखेर चार पावत्या दिल्या. त्यांचा क्रमांक ४४०५,४४०६,४४०७ व ४४७९ असा आहे. पावतीवर ग्रामपंचायत मांगेली, अभ्यागत कर १० रुपये असे लिहिलेले असून, पावतीवर ठेकेदाराचे नाव नाही. चौकशी करता ठेकेदाराने आपले नाव संजय गवस असल्याचे सांगितले. ज्या रस्त्यावर ते प्रवाशांची वाहने अडवून पैसे घेतात. तो रस्ता सरकारी आहे. खोक्रल ते मांगेली तळेवाडी, फणसवाडी व सडयापर्यंत रस्ता व्हावा, दुर्गम गाव आणि सर्व वाड्या विकासाच्या प्रवाहात याव्यात म्हणून पत्रकारांनी मोठे योगदान दिले आहे. गावकऱ्यांना याबाबत माहिती व जाणही आहे. मात्र, संबंधित ठेकेदार गोव्यात राहतो. त्यामुळे त्या ठेकेदार युवकाची भाषा उद्धटपणाची, उडवाउडवीची आहे .धबधबा फणसवाडीमध्ये आहे. त्या वाडीवर धबधबा पाहण्यासाठी न जाता कुणी पाहुण्यांकडे किंवा मित्रांकडे जात असतील, तर त्यांच्याकडूनही त्यांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता ठेकेदार आणि त्याची माणसे तळेवाडी येथे दादागिरी करून पैसे उकळत असल्याचा आरोप होतोय.










