LIVE UPDATES

५ नोव्हेंबरला महात्मा फुले महसूल लोक अदालत

प्रलंबित अपील प्रकरणे निकाली काढण्याची संधी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 23, 2026 17:17 PM
views 32  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील प्रलंबित महसुली दावे व अपील प्रकरणांचा परस्पर संमतीने तडजोडीद्वारे जलदगतीने निपटारा करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयात दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता महसूल लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांच्या अधिनस्त उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयांमध्ये जमिनीच्या मोजणीची प्रकरणे, फेरफार नोंदी, एकत्रीकरण योजनेतील चूक दुरुस्ती तसेच इतर तक्रारी आणि कार्यवाहीसंदर्भातील अपील प्रकरणे दाखल होत असतात. अशा प्रकरणांमध्ये सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करून अंतिम निर्णय होईपर्यंत पक्षकारांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा व श्रम खर्च होतात.

महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालतीच्या माध्यमातून दोन्ही पक्षकार परस्पर संमतीने तडजोडीस तयार असल्यास संबंधित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तडजोडीस इच्छुक पक्षकारांनी स्वतः किंवा विधिज्ञामार्फत जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाकडे लेखी अर्ज साद करावा. संबंधित प्रकरणातील प्रपत्र ‘अ’ मधील नमुन्यानुसार तडजोडीसाठी अर्ज करता येईल.

 प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर दोन्ही पक्षकारांची तडजोडीसाठी संमती निश्चित करण्यात येईल. त्यानंतर नियमानुसार तडजोडनामा तयार करून महसूल लोक अदालतीच्या दिवशी दोन्ही पक्षांच्या संमतीने अंतिम आदेश पारित करण्यात येणार आहे.

 या प्रक्रियेमुळे तोंडी युक्तिवाद, उलटतपासणी आणि दीर्घ सुनावणी यांसारख्या बाबी टाळून प्रकरणांचा जलद निपटारा होण्यास मदत होणार आहे. तसेच पक्षकारांचा वेळ, पैसा व श्रम वाचून परस्परांतील वाद सलोख्याने मिटण्यास मदत होणार आहे.

 जिल्ह्यातील ज्या शेतकरी व नागरिकांची महसुली दावे अथवा अपील प्रकरणे दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत आणि संबंधित दोन्ही पक्षकार परस्पर संमतीने तडजोड करण्यास तयार आहेत, त्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख अनुप जावळे यांनी केले आहे.