
वैभववाडी: तालुक्यातील उंबर्डे येथील रहिवासी आणि सांगली जिल्ह्यातील सावळज येथील महात्मा गांधी विद्यालयात ज्युनिअर विभागात इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले रमाकांत पांचाळ यांनी इंग्रजी विषयातून राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) सलग दुसऱ्यांदा उत्तीर्ण केली.
शिक्षकी पेशाची जबाबदारी सांभाळत त्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास व मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (MH-SET) २०२३ मध्येही इंग्रजी विषयातून यश मिळविले आहे. त्यामुळे NET आणि SET या दोन्ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण करण्याची त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणाची कास धरलेल्या पांचाळ यांच्या या यशाबद्दल महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सावळज येथील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, मित्रपरिवार तसेच उंबर्डे व वैभववाडी परिसरातून अभिनंदन होत आहे.











