
देवगड : पावसाअभावी भातशेती करपत असल्याच्या तक्रारी वाढत असताना पंचायत समिती आणि तालुका कृषी विभागाने कोणत्याही आदेशाची वाट न पाहता संबंधित कृषी सहाय्यकांसमवेत प्रत्यक्ष शेत पाहणी करावी, नुकसानीचे पंचनामे करून वस्तुनिष्ठ अहवाल चार दिवसांत सादर करावा, असे सक्त आदेश देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांनी दिले.
त्याचबरोबर आंबा-काजू नुकसानभरपाईची किती रक्कम शेतकऱ्यांना मिळाली, किती लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आणि किती शेतकऱ्यांची केवायसी प्रलंबित आहे, याची संपूर्ण आकडेवारी तातडीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी तालुका कृषी विभागाला दिले.
देवगड पंचायत समितीची मासिक सभा छत्रपती संभाजी महाराज सभागृहात सभापती गणेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती अमोल लोके, गटविकास अधिकारी निलेश जगताप, पंचायत समिती सदस्य-सदस्या तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच कुणकेश्वर येथे ताज हॉटेल प्रकल्पाबाबत करार झाल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सदस्य रविंद्र तिर्लोटकर व ज्येष्ठ सदस्य सदाशिव ओगले यांनी लक्ष वेधले. गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने भातपिकावर संकट आले असून अनेक ठिकाणी भातशेती करपत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली. यावर सभापती गणेश राणे यांनी पंचायत समिती आणि कृषी विभागाने संबंधित भागातील कृषी सहाय्यकांसह पाहणी करून पंचनामे करावेत व चार दिवसांत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश दिले.
आंबा-काजू नुकसानभरपाईचा प्रश्नही सभेत चांगलाच गाजला. नुकसानभरपाई जाहीर होऊनही देवगड तालुक्यातील अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा झालेली नसल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. कृषी विभागाकडून केवायसीचे कारण पुढे केले जात असले तरी शेतकऱ्यांना ठोस माहिती मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
देवगड तालुक्यात गणेश चतुर्थीच्या कालावधीत केवळ सुमारे ३० टक्के शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली असून उर्वरित ७० टक्के शेतकरी प्रतीक्षेत असल्याचा मुद्दा सदाशिव ओगले यांनी उपस्थित केला. कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसानभरपाईचे वाटप झाले असताना देवगडमध्येच हा प्रश्न का निर्माण झाला, अशी विचारणाही त्यांनी केली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत सभापती राणे यांनी संबंधित मंडल अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि कृषी सेवक यांनी दोन दिवसांत आपल्या दालनात सविस्तर खुलासा सादर करावा, असे निर्देश दिले. शेतकऱ्यांना थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेऊ नये, पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचा लाभ तातडीने मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी बजावले. कोटकामते-किंजवडे परिसरातील शेतकऱ्यांना फार्मर आयडीची समस्या भेडसावत असल्याचा मुद्दाही सभेत मांडण्यात आला.
ग्रामपंचायत अफहार प्रकरणामुळे ३४ ग्रामपंचायतींवर ठपका ठेवण्यात आल्याचा मुद्दा रविंद्र तिर्लोटकर यांनी उपस्थित केला. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले असून सध्या २३ ग्रामपंचायतींवर प्रशासक असल्याचे सभेत सांगण्यात आले. अधिकाऱ्यांकडे स्वतःच्या विभागासोबत अतिरिक्त प्रशासकीय जबाबदारी असल्याने कामकाजावर परिणाम होऊ नये, तसेच १५ व्या वित्त आयोगाची रक्कम वाया जाऊ नये, यासाठी दक्षतेने काम करण्याची सूचना उपसभापती अमोल लोके यांनी केली.
बांधकाम विभागाकडे तीन कनिष्ठ अभियंते कार्यरत असून कोणतेही अंदाजपत्रक प्रलंबित राहणार नाही, यासाठी शाखा अभियंत्यांनी नियोजन करावे, असे निर्देश सभापती राणे यांनी दिले. दाभोळे, दहीबाव, नारिंगे आणि मशवी मार्गावरील झाडी तसेच खड्डे बुजविण्याचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याबद्दल सदाशिव ओगले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली.
देवगड तालुक्यातील दूध संकलनाचा आढावा घेत अंगणवाडीतील प्रत्येक विद्यार्थ्याला २०० मिली दूध उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सभापती राणे यांनी सांगितले. संपूर्ण तालुक्यात हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने तालुक्यातील दूध संकलनाची क्षमता तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची संख्या याची माहिती सादर करावी, अशी सूचना त्यांनी केली. गुरांसाठी कोंडवाडा व गायरानासाठी दाभोळे, किंजवडे आणि बापर्डे ग्रामपंचायतींनी जागा उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शविल्याची माहितीही सभेत देण्यात आली.
चतुर्थीपूर्वी एसटी वाहतुकीचे नियोजन करण्याची सूचना देऊनही विजयदुर्ग आगाराने अपेक्षित नियोजन केले नसल्याचा मुद्दा रविंद्र तिर्लोटकर यांनी मांडला. विजयदुर्ग आगारामार्फत विरार, चिपळूण आणि सावंतवाडी मार्गावर अतिरिक्त गाड्यांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. तळवडे येथे बीएसएनएलचा टॉवर उभारण्यासाठी पंचायत समितीच्या नावे असलेली दोन गुंठे जागा उपलब्ध करून देण्याची मागणी समृद्धी चव्हाण यांनी केली. या जागेबाबत ठराव घेण्यात आला.
गणेश चतुर्थीपूर्वी इंदिरा आवास योजनेतील मंजूर लाभार्थ्यांच्या घरांना वीजपुरवठा करण्याचे आदेश देऊनही काही घरांना अद्याप वीज जोडणी मिळाली नसल्याचा मुद्दा सदाशिव ओगले यांनी उपस्थित केला. त्यामुळे संबंधित कुटुंबांना सणाच्या काळात अंधारात राहावे लागल्याचे त्यांनी सांगितले. पशुवैद्यकीय कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पंचायत समितीत तात्पुरत्या नेमणुका दिल्याने मूळ कार्यालयातील कामकाजावर परिणाम होत असल्याने त्यांना पुन्हा संबंधित कार्यालयात पाठवावे, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, दिल्ली येथील आंदोलनाबाबत सरकारविरोधी मजकूर असलेले स्टेटस मोबाईलवर ठेवल्याप्रकरणी संबंधित कृषी सहाय्यकाने लेखी खुलासा सादर केला आहे. हे स्टेटस अनावधानाने ठेवण्यात आले असून ते तात्काळ हटविण्यात आले आहे, असे नमूद करून त्याने माफी मागितली आहे. मात्र संबंधित कर्मचाऱ्याने पंचायत समितीच्या सभेत सर्व सदस्यांच्या उपस्थितीत सरकारची जाहीर माफी मागावी, अशी भूमिका सदस्यांनी घेतली.
गटविकास अधिकारी निलेश जगताप यांनी १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत असून, या कालावधीत २६ कार्यक्रम होणार असल्याची माहिती दिली. तसेच २ ऑक्टोबर रोजी तालुक्याच्या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.











