
सिंधुदुर्गनगरी : ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत समाज कल्याण विभाग, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आज सिद्धार्थनगर, ओरोस येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळी ७.१५ वाजता झालेल्या या अभियानात सिद्धार्थनगर येथील समाज मंदिर, रस्ते तसेच परिसराची स्वच्छता करण्यात आली.
सहायक आयुक्त संतोष चिकणे यांच्या उपस्थितीत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून परिसरातील प्लास्टिक व कचरा संकलित केला. या उपक्रमामुळे संपूर्ण परिसर प्लास्टिकमुक्त व कचरामुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी समाज कल्याण अधिकारी, तुषार गवळी, सहायक लेखाधिकारी उदय यादव तसेच समाज कल्याण विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि बी.व्ही.जी./क्रिस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.
दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत समाज कल्याण विभागामार्फत ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत.












