
वेंगुर्ला : ‘टँकरमुक्त वेंगुर्ला’नंतर आता ‘बॅनरमुक्त वेंगुर्ला’ करण्याचा निर्धार वेंगुर्ला नगरपरिषदेने केला असून, शहरात यापुढे कोणत्याही प्रकारचे बॅनर लावण्यास परवानगी दिली जाणार नाही. गणेश चतुर्थीपुरते मर्यादित न राहता हा निर्णय कायमस्वरूपी लागू करण्याचा मानस असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली.
बॅनरला पर्याय म्हणून शहरात ५ ठिकाणी 'एलइडी स्क्रीन' बसवण्यात येणार असून त्यावर अल्पदरात जाहिराती प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीत नागरिकांच्या उपस्थितीत, नागरिकांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचेही नगराध्यक्ष गिरप यांनी सांगितले
वेंगुर्ला शहरातील वाहतूक, स्वच्छता व शहराच्या सौंदर्याचा विचार करता बॅनरमुळे निर्माण होणारी समस्या लक्षात घेऊन नगरपरिषदेने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व इतर नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा झाली. याबाबत माहिती देण्यासाठी आज शनिवारी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक गौरी मराठे, सचिन शेटये, सदानंद गिरप आदी उपस्थित होते.
डिजिटल माध्यमातून पोहोचविणार संदेश
नियोजनासाठी झालेल्या बैठकीत यापुढे वेंगुर्ला बॅनरमुक्त ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला, असे गिरप यांनी स्पष्ट केले. मात्र नागरिक, राजकीय पक्ष, व्यापारी सामाजिक संस्था तसेच विविध व्यावसायिकांना जाहिरात व शुभेच्छा संदेशांसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील दाभोली नाका, बाजारपेठ, हॉस्पिटल नाका, पॉवरहाऊस, पिराचा दर्गा अशा पाच प्रमुख ठिकाणी डिजिटल एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार आहेत.
याठिकाणी वाजवी दरात जाहिराती, शुभेच्छा संदेश व अन्य माहिती प्रदर्शित करता येणार आहे. एका जाहिरातीसाठी ठरावीक कालावधीची स्लॉट व्यवस्था करण्यात येणार असून, जाहिराती सातत्याने रिपीट होत राहतील. त्यामुळे बॅनर लावण्याची गरज राहणार नाही आणि एकाच वेळी शहरातील हजारो नागरिकांपर्यंत डिजिटल माध्यमातून संदेश पोहोचविता येईल.
विशेष म्हणजे, बॅनर तयार करणे, छपाई करणे व लावण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत वाजवी दरात डिजिटल जाहिरात उपलब्ध करून देण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न राहणार आहे. “टँकरमुक्त वेंगुर्ला केला, त्याच धर्तीवर आता कायमस्वरूपी बॅनरमुक्त वेंगुर्ला करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहराचे सौंदर्य, स्वच्छता आणि शिस्त राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. असे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितले.
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला शहरातील वाहतूक, पार्किंग, बाजारपेठेतील नियोजन, सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य व्यवस्था आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नगरपरिषदेच्या वतीने सविस्तर नियोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली २० ऑगस्ट रोजी झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव नियोजन बैठकीत सर्वपक्षीय प्रतिनिधी, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, पोलीस, तहसील कार्यालय, महावितरण, आरोग्य विभाग, एस.टी. महामंडळ, रिक्षा संघटना तसेच नागरिकांच्या उपस्थितीत विविध निर्णय घेण्यात आले.
वाहतूक पार्कींग
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील गर्दी, वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या लक्षात घेऊन चारचाकी, दुचाकी, तीनचाकी व मालवाहू वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. चारचाकी वाहनांसाठी गणेश कॉम्प्लेक्स, शाळा क्रमांक १, सिद्धिविनायक प्लाझा, कन्याशाळा, नगरवाचनालय, पाटील सेंटर, लता अपार्टमेंट तसेच महालक्ष्मी कॉम्प्लेक्ससमोरील मोकळ्या जागेचा विचार करण्यात आला आहे.
दुचाकी वाहनांसाठी वेंगुर्लेकरवाडी व रामेश्वर मंदिर परिसर, तर मालवाहू तीनचाकींसाठी सप्तसागर ते मारुती मंदिर परिसराचा वापर करण्याचे नियोजन आहे. मोठ्या वाहनांसाठी सागररत्न मत्स्यबाजारासमोरील मोकळी जागा, सप्तसागर, रामेश्वर मंदिर, मराठी शाळा क्रमांक १ चे पटांगण आदी ठिकाणांचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
१० ते २६ सप्टेंबरदरम्यान अवजड वाहनांना पर्यायी मार्ग
गणेशोत्सव कालावधीत १० ते २६ सप्टेंबर या कालावधीत शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. हॉस्पिटल नाका ते दाभोली नाका या मुख्य मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक नियंत्रित करून त्यांना पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आवश्यक ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याच काळात एस.टी. बसचा थांबा दरवर्षीप्रमाणे रामेश्वर मंदिराजवळ ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रामेश्वर मंदिर व हॉस्पिटल नाका येथे एस.टी. महामंडळाकडून कर्मचारी नियुक्त करण्याची सूचना करण्यात आली आहे.
१२ व १३ सप्टेंबरला मुख्य बाजारपेठेत वाहनांना प्रवेशबंदी
गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या माटवीच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने १२ व १३ सप्टेंबर रोजी बॅ. खर्डेकर रोडवरील मारुती मंदिर ते दाभोली नाका या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. या दोन दिवसांत रस्त्याच्या दुतर्फा किरकोळ व्यापाऱ्यांना माटवीचे साहित्य विक्रीसाठी जागा देण्यात येणार आहे. रिक्षांसाठी मुख्य बाजारपेठेत एकेरी मार्गाची (वन-वे) व्यवस्था करण्यात येणार आहे. गणपती विसर्जनानंतर पाच दिवसांनी याच मार्गावर चारचाकी वाहनांसाठीही एकेरी वाहतुकीची व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे.
शहरात ट्रॅव्हल्स थांबविण्यास बंदी
गणेशोत्सव कालावधीत शहरातून जाणाऱ्या ट्रॅव्हल्सना शहरातील रस्त्यांवर थांबण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे. ट्रॅव्हल्ससाठी मानसीश्वर उद्यानासमोरील मोकळी जागा आणि कॅम्प येथील स्टेडियमशेजारील मोकळी जागा या दोन ठिकाणीच थांबण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
व्यापाऱ्यांच्या मालवाहू गाड्यांसाठी निश्चित वेळ
बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठीही वेळ निश्चित करण्यात आली आहे. १० ते २६ सप्टेंबरदरम्यान रात्री ९ ते पहाटे ५ या वेळेतच मालवाहू वाहनांना शहरात माल वाहतूक करता येणार आहे. इतर दिवशी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत मालवाहतुकीस परवानगी देण्यात येणार आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर
गणेशमूर्ती मातीच्या अथवा शाडू मातीच्या असाव्यात, यावर नगरपरिषदेने भर दिला आहे. गणेशमूर्तीभोवतीची सजावटही प्लास्टिक व थर्माकोलमुक्त असावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. प्लास्टिक किंवा थर्माकोलचा वापर निदर्शनास आल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही गिरप यांनी सांगितले.
आरोग्य, वीज व अग्निसुरक्षेचीही तयारी
गणेशोत्सव कालावधीत आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी उपजिल्हा रुग्णालयामार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयाकडून एस.टी. स्टँड येथे पथक उपलब्ध करून देण्याचीही सूचना करण्यात आली आहे.
महावितरणने गणेश चतुर्थीच्या काळात लोडशेडिंग करू नये, तसेच वीजवाहिन्यांवरील धोकादायक फांद्या गणेशोत्सवापूर्वी तोडून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रात्री ९ नंतर वीजसंबंधी तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध ठेवण्याबाबतही नियोजन करण्यात आले आहे.










