LIVE UPDATES

सिंधुदुर्गातील ‘नारळ फेम’ बाबाच्या भोंदूगिरीचा अंनिसने केला 'पर्दाफाश'

भोंदूगिरीविरुद्ध लढा, देव-धर्माला विरोध नाही : विजय चौकेकर
Edited by:
Published on: August 22, 2026 17:54 PM
views 516  views

सिंधुदुर्ग : अंधश्रद्धेच्या बाजारात ‘समर्थां’च्या नावाचा ढालीसारखा वापर करत भाबड्या भक्तांच्या भावनांशी खेळणाऱ्या एका भोंदू बाबाची हवा अंनिसच्या एकाच इशाऱ्यात गुल झाली. “हातात आडवा धरलेला नारळ आपोआप उभा राहतो आणि स्वामी माझ्याशी बोलतात,” अश्या दाव्यानिशी अवतारी पुरुष बनू पाहणाऱ्या या भोंदूची अंनिसचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी अशी काय ‘नाडी’ तपासली की, चमत्काराची सगळी ऐट क्षणात विरली.

कायदेशीर दणक्याची चाहूल लागताच, माझ्यात कोणतीही अलौकिक शक्ती नाही, ही तर फक्त हाताची सफाई अशी लेखी कबुली देत बाबाने मांडलेला भोंदुकोग्याचा खेळ अवघ्या काही मिनिटांत गुंडाळला. दिव्य शक्तीचा साक्षात्कार, स्वामींशी थेट संवाद आणि हातात आपोआप उभा राहणारा नारळ... अशा भुलभुलैयाच्या जाळ्यात भाविकांना ओढणाऱ्या एका भोंदूबाबाचा बुरखा अंनिसने (अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती) एकाच फटक्यात फाडला आहे.

सिंधुदुर्गातील एका गावात वर्षानुवर्षे चाललेला हा चमत्कारी शकुनाचा खेळ अखेर सपशेल फ्लॉप ठरला आहे. सिंधुदुर्गातील एका गावात हा ढोंगी बाबा स्वतःला श्रीसमर्थ स्वामींचा अवतार सांगून ठाण मांडून बसला होता. "हातात आडवा धरलेला नारळ आपोआप उभा राहतो आणि स्वामी मला लोकांच्या समस्या अन् त्यावरचे तोडगे सांगतात," असा दावा करून तो भाबड्या लोकांच्या श्रद्धेचा खेळ खंडोबा करत होता.

'नारळाच्या आव्हाना'ने भोंदू बाबाची बोबडी वळली

एका महिलेने फसवणुकीची तक्रार दिल्यानंतर अंनिसचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी या प्रकरणाची शहानिशा सुरू केली. पहिल्या दोन फेऱ्यांत एकटे जाऊन आणि तिसऱ्यांदा एका दुसऱ्याच तरुणाला आपला मुलगा म्हणून नेऊन चौकेकर यांनी बाबाचा बनाव उघड केला. भोंदू बाबाला काहीही ओळखता आले नाही. अंतिम प्रसंगी अंनिसचे अध्यक्ष ॲड. राजीव बिले, सचिव अजित कानशिडे आणि कुडाळ उपाध्यक्ष अतुल दळवी यांनी बाबाचे घर गाठले.

चौकेकर यांनी हातात नारळ धरून आव्हान दिले, "स्वामींच्या नावाला कलंक लावून लोकांची फसवणूक करत असाल, तर स्वामींच्या कृपेने माझ्याही हातात नारळ उभा राहू दे. तसे झाले तर स्वामींनीच शिक्षा करायला सांगितली असे समजून जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करतो" या थेट आव्हानाने भोंदू बाबाची पाचावर धारण बसली आणि त्याने सफशेल शरणांगती पत्करली.

कायद्याचा धाक अन् मुलीच्या आजारपणाचा विचार

जादूटोणा विरोधी कायद्याची माहिती आणि होणाऱ्या शिक्षेची जाणीव होताच बाबाने स्वतःची चूक मान्य केली. "कुटुंबाच्या चरितार्थासाठी लोकांची मानसिकता ओळखून मी समर्थ स्वामींच्या नावाने फसवणूक करत होतो. माझ्यात कोणतीही दिव्य शक्ती नाही," असे लेखी लिहून देत त्याने पुन्हा असे कृत्य न करण्याचे वचन दिले.

परिसरामध्ये फसवणूक थांबवल्याचा बोर्ड लावण्याचेही त्याने मान्य केले. सदर बाबाच्या मुलीची प्रकृती बिघडलेली असल्याने आणि कायदेशीर कारवाईचा तिच्यावर विपरीत परिणाम होऊ नये, या मानवतावादी दृष्टिकोनातून चौकेकर यांनी त्याला एक संधी देण्याचा निर्णय घेतला. वाडीतील ग्रामस्थांच्या साक्षीने आणि त्यांनी घेतलेल्या हमीवर पोलीस तक्रार न करता त्याला सोडण्यात आले.

'भोंदूगिरीविरुद्ध लढा, देव-धर्माला विरोध नाही'

"अंनिसचा देव किंवा धर्माला कधीही विरोध नाही. देव ही प्रत्येकाची श्रद्धा आहे. परंतु देवाच्या नावाने स्वतःला अवतार सांगून सर्वसामान्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या आणि स्वार्थ साधणाऱ्या भोंदू लोकांविरुद्ध आमचा लढा सुरूच राहील," असा स्पष्ट इशारा विजय चौकेकर यांनी दिला आहे. तसेच परिसरात असा कोणताही प्रकार आढळल्यास तात्काळ अंनिस अथवा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.